
कसाल गावातील गणपती मूर्ती कला केंद्र भाग एक मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वातंत्र्य पूर्व काळात चार शाळा कार्यरत होत्या त्यापैकी पहिले वेंगुर्लेकर दुसरे कोचरेकर तिसरे रेवडेकर आणि चौथे कै.उमाजी पेडणेकर.
कै.उमाजी पेडणेकर यांच्या गणपती शाळेची सुरुवात ढोकमवाडी येथील घरात झाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पैसे कमविण्याचे साधन नाही तर गावा गावातील गणपतीच्या मूर्तीची गरज म्हणून आजुबाजूच्या परिसरातील तरुण मुलांना सोबत घेऊन गणपती मूर्ती बनविताना त्यांनाही मूर्तिकार बनविले आणि कालांतराने या तरुणांनी १०/१५ वर्ष काम केल्यावर आपल्या भागात गणपती मूर्ती बनविण्याच्या शाळा सुरू केल्या.
म्हणजेच आपल्या गावातील या चार मूर्तिकारानी मातीच्या मुर्ती बनविताना अनेक जीवंत मूर्तिकार घडविले आणि पुढील काळात हेच मूर्तिकार आपल्या पायावर उभे राहून स्वतंत्रपणे व्यवसाय करू लागले.
याचाच अर्थ या चार मूर्तिकारानी विद्यादान करून अनेक मूर्तिकार घडविले हे त्या काळातील विशेष होय. त्या काळी मूर्ती कशाप्रकारे बनविली जायची याची माहिती यापूर्वीच्या लेखात आलीच आहे. पण आपल्या कसाल गावांतून आजुबाजूच्या पंधरा/ वीस गावात याच शाळातून गणपती जायचे.आणि तेही अल्प किमतीत किंबहुना नारळ अगरबत्ती एवढ्यावरच.. यातही या बुजुर्गांचा दानशूर, गरीब सर्वसामान्य लोकांना मदत ही वृत्ती खूप शिकण्यासारखी आहे.
पेडणेकर यांच्या शाळेत त्याकाळी चारशेच्या वर मूर्ती असायच्या आणि पावसाळी शेतीच्या कामानंतर गणपती मूर्ती बनविण्याचे काम दिवसभरात रात्री सुद्धा गॅसबत्ती च्या प्रकाशाते चालायचे.
ढोकमवाडीतुन पेडणेकर यांची शाळा नवा बाजार येथील मरतल यांच्या घरात सुरू झाली आणि वार्धक्यामुळे ही जबाबदारी त्यांनी सोबत मातीतून नागोबा बनविणाऱ्या मुलगा कै.दाजी पेडणेकर यांचेकडे सुपूर्द केली.
त्या काळात पेडणेकर यांची शाळा ही आकर्षक रंगसंगती आणि आकाराने मोठ्या असलेल्या सुबक मूर्तींची शाळा अशी खास ओळख होती.
दाजी पेडणेकर यांच्या सोबत त्यांचे मुलगे दिगंबर पेडणेकर यांनीही पुढे मूर्तिकार म्हणून लक्ष घालून या शाळेची धुरा वाहू लागले.
कालांतराने कसाल हायस्कूलची एक प्रकारची ढाल म्हणून ज्यांची ओळख दशक्रोशीत होती, पेशाने कसाल हायस्कुल मध्ये नाईक शिपाई पदावर काम करत असताना ज्यांच्या बद्दल विद्यार्थी वर्गात भीतीयुक्त आदर होता असे मनोहर पेडणेकर यांनी आपल्या भावाकडून या मूर्ती केंद्राची कलेची परंपरा आपल्या कडे घेतली आणि सहकारी कारागीर यांच्या मदतीने आजोबांच्या शाळेचा कलात्मक वारसा पुढे चालू ठेवला.
व्यवसाय म्हटला की स्पर्धा आली, त्यात आकर्षक रंगसंगती,विविध आकारातील मूर्ती, मूर्तीची सफाईदारपणा,डोळ्यांची आखीव रेखनी, आणि चांगल्या कंपनीचे रंग अशा मुळे ज्या शिल्पकाराकडे हे सातत्य किंवा विविधता जपली जाते.
याचे भान ठेवून या परंपरागत मूर्ती शाळेला आगळावेगळा आकार देउन *आकार शिल्पालय* म्हणून २००८ सालापासून मनोहर पेडणेकर यांचे चिरंजीव एकनाथ पेडणेकर यांनी शाळा नवीन धाटणीच्या स्वरूपात उदयास आणली.
नव्या युवा पिढीला गणपतीची मुर्ती कशी पाहिजे याची नस ओळखून एकनाथ याने गणपती बनविण्याच्या साचेबद्ध पद्धतीत बदल करून वेगवेगळ्या स्वरूपातील,आकारातील आणि उंचीतील गणेश मूर्ती करण्याचे धनुष्यबाण उचलून त्यांनी या शिल्पालयाची ख्याती सिंधुदुर्ग जिल्हयात पसरवली.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून येथे गणपतीच्या मूर्तीच्या मागणी येऊ लागली. आज या शिल्पालयात शंभर पेक्षा जास्त आकर्षक रंगसंगती असलेल्या मुर्त्या असतात. आणि साहजिकच एकनाथ यांना मदत करण्यासाठी त्यांची पत्नी संपदा, कुटुंबातील सदस्य गणेश महेश ,मयूर, साहिल मदत करतात.
ज्यांच्या बोटातच कलात्मकता आहे आणि त्यातून निर्माण होणारी शिल्प ही खरोखरच एकटक लावून बघण्यासारखी असतात. पण जमिनीशी आपले नाते अबाधित ठेवून पेडणेकर कुटुंब या शिल्पालयात मुर्ती घडवताना,त्यांना आकार देताना या मातीशी जुळलेली नाळ तेव्हढीच घट्ट विणून ठेवतात हे विशेष.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ही गणपती शाळा आता शतकापूर्तीकडे वाटचाल करतेय ही खरोखरीच आम्हा कसाल वासिय म्हणुन अभिमानास्पद आहे.
सद्यस्थितीतील वाढती महागाई आणि मूर्तीचे वाढते दर याचा विचार करता कोकणातील गणपती प्रेमी कुटुंब याचा कधीही विचार करत नाहीत पण पेडणेकर यांनी एक गोष्ट जोपासली आहे ती मूर्तीच्या किमतीपेक्षा माणुसकी. आणि यातूनच कै.उमाजी पेडणेकर यांच्या गणपती शाळेचे रूपांतर प्रसिद्ध झालेल्या आकार शिल्पालय मध्ये झाले आहे.पेडणेकर कुटुंबाने मातीशी इनाम राखत मातीचा जपलेला हा वारसा..
संतोष कदम, कसाल
9422435855