तिलारी खोऱ्यातील 'वाईल्ड वन' ची गरुडझेप

पर्यटन खात्याने केला मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सन्मान
Edited by: संदीप देसाई
Published on: November 01, 2022 16:06 PM
views 325  views

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात वाईल्डलाईफ पर्यटन क्षेत्रात धाडसी पाऊल उचललेल्या 'वाईल्ड वन तिलारी, या संस्थेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा 'शाश्वत पर्यटन आणि ग्रामीण रोजगार उपलब्धता, यासाठी विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.


तिलारी खोऱ्यात या संस्थेने पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वाईल्डलाईफ इको टुरिझम विकसित करत ग्रामीण भागात पर्यटन व विकास व रोजगार चालना देण्यासाठी केलेल्या कामाचा हा गौरव म्हणावा लागेल. नुकताच मुंबई येथे हा गौरव सोहळा राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला. यावेळी 'तिलारी वाईल्ड वन: चे संचालक महेश महाँगोरे यांनी हा सन्मान स्वीकारला. दरवर्षी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांत लक्षवेधी काम करणाऱ्या पर्यटन रोजगार व्यावसायिकांचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सन्मान केला जातो. यावर्षी या सन्मानासाठी तिलारी वाईल्ड वन मानकरी ठरले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी राज्याचे MTDC चे अधिकारी, युनेस्को व केंद्रीय पर्यटन विभागाचे अधिकारी सुद्धा होते.


त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिल्या पर्यटन जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या  सह्याद्रीच्या कुशीत तेरवन मेढे येथे गेल्या चार वर्षांपासून तिलारी वाईल्ड वन हे पर्यटन स्थळ विकसित केले आहे. अतिशय खडतर परिस्थितीत महेश महाँगोरे व त्यांचे सहकारी यांनी मोठ्या धाडसाने सह्याद्रीच्या डोंगर रांगात निर्माण केलेले हे पर्यावरणीय टुरिझम स्थळ आज महाराष्ट्रच नव्हे तर देश-विदेशातील पर्यावरण व निसर्ग प्रेमी यांना भुरळ घालत आहे. त्यामुळे हे पर्यटन स्थळ विकसित होऊन यातून आता स्थानिकांना सुद्धा मोठा रोजगार मिळू लागला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र व पर्यावरण प्रेमी तेजस ठाकरे यांसह  महाराष्ट्र मधील अनेक वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण प्रेमी, निसर्गमित्र, वनखात्यातील बडे अधिकारी यांनी ' तिलारी वाईल्ड वन' ला पहिली पसंदी दिली आहे. आणि आता तर तिलारी खोऱ्यात 'तिलारी संवर्धन राखीव' क्षेत्र जाहीर झाल्याने व लगतच हेवाळे बाँबर्डे येथील 'मायरिस्टीका स्वयंम' चे दुर्मिळ जंगल यामुळे तिलारी वाईल्ड वन आगामी काळात तिलारी खोऱ्यात पर्यटनाचे हॉटस्पॉट बनणार आहे.



वाईल्ड वन ची गरुडझेप तिलारी पर्यटनासाठी शुभसंकेत..


तिलारी खोऱ्यात अलीकडेच दशक्रोशीतील युवाई तिलारी पर्यटन व रोजगार या मंच खाली संघटित झाली आहे. सुमारे ५०० हुन अधिक युवा वर्ग या प्लॅट फॉर्म खाली संघटित होऊन निसर्गाचे वरदान लाभलेल्या व तिलारी धरणाने विशाल जलाशय  उपलब्ध असलेल्या तिलारी खोऱ्यात पर्यटन विकासाची हाक देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पर्यटन जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तीलारीत 'अँम्युजमेंट पार्क' सारखे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित केल्यास खऱ्या अर्थाने तीलारीच्या पर्यटनाला चार चाँद लागणार असून रोजगाराचे नवे दालन रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवाई साठी उपलब्ध होणार आहे. पर्यटन विकासाच्या मागणीला तिलारी वाईल्ड वन च्या या उत्तुंग भरारीने महाराष्ट्रात पर्यटन वृद्धिंगत करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे तिलारी कडे लक्ष वेधले गेले आहे.



होम स्टे संकल्पना वाढल्यास ग्रामीण भागात रुजेल रोजगार; महेश महाँगोरे यांनी वेधलं पर्यटन मंत्र्यांचे लक्ष


खास बाब म्हणजे मुंबई नरिमन पॉईंट येथे झालेल्या पर्यटन पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री.महाँगोरे यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होम स्टे ही संकल्पना अधिक व्यापक पणे वाढविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.इतकंच नव्हे पर्यटन क्षेत्रात असे होम स्टे करू इच्छिणाऱ्या युवाई व ग्रामस्थाना शासनाने खास योजना राबवून काही प्रोत्साहन निधी उपलब्ध करून दिल्यास ओस पडत चाललेल्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा आपलं अस्सल ग्रामीण जीवनाच वैभव पाहायला मिळेल अशी भूमिका व्यक्त केली. त्याला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला.



हे ही आहेत वाईल्ड वन चे चाहते.. 


तिलारी हा आता जैवविविधतेच्या दृष्टीने जणू अँमझॉन खोऱ्यासारखा स्पॉट बनला आहे. म्हणूनच तिलारी वाईल्ड वनला तेजस ठाकरे यांसह कोल्हापूरचे संभाजी राजे, चीफ जस्टीस, वाईल्डलाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे अधिकारी आणि अनेक संशोधक सुद्धा वाइल्ड वन ला राहून गेले आहेत.