दुबई सफर | मरुभूमीकडील प्रवास..!

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची खास प्रवासवर्णन लेखमाला आजपासून..
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 11, 2022 12:58 PM
views 439  views

भाग 1 


दुबईला जायचं स्वप्न तर सर्वांचच असतं, प्रत्येकाला हे भाग्य लाभत नाही. ज्यांना लाभतं त्यांच्याकडुन अनुभव ऐकणं, हाही दुबई वारीइतकांच रोमहर्षक अनुभव असतो. त्यामुळं खास कोकणसाद स्प्टम् च्या दर्शकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची ही खास दुबई वारी आम्ही मालिकेच्या स्वरूपात आजपासुन दर रविवारी घेवून येत आहोत... 


कागल येथील "सिद्धार्थ टुर्स अँड ट्रॕव्हल्स"तर्फे आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर रात्री पोहोचलो. आतमध्ये प्रवेश करुन बोर्डींग पास घेतला. लगेज चेक इन करुन सुरक्षिततेचे सोपस्कार पूर्ण करुन गेट क्रमांक ७० वर स्थिरावलो. दुबईला जाणारे आम्ही सर्व उत्साही पर्यटक स्टँडवर एसटी ची वाट पहावी, अगदी तसे पहाटे-पहाटे पर्यंत विमानाची पहात होतो. विमानाची वेळ उलटत होती. ते नियोजित वेळेनुसार आले नव्हते. अखेर विमान लँडींग झाले. विमानातील प्रवाशी उतरल्यानंतर काही काळ त्याच्या साफ-सफाईत गेला. त्यानंतर आम्हा पर्यटकांचा विमानात प्रवेश झाला.


दाराशीच असणाऱ्या अरेबियन हवाई सुंदरी गोड हसून स्वागत करत होत्या. विमानातील प्रवाशांवर नजर टाकली असता, अत्यंत बारीक वेण्या घातलेल्या गाऊनमधील धिप्पाड सुदानी तसेच गोरे गोमटे युरोपीयन-कोरीयन शिवाय आम्ही सर्व सावळे भारतीय दिसले. 'बखूर' हे अत्तर या सुदानी महिलांनी लावल्याचे त्याच्या सुगंधावरुन प्रकर्षानं जाणवलं. सर्व प्रवाशी आपा-पल्या जागेवर स्थानापन्न झाले. 'गुड माॕर्निंग'..सोबतच कप्तानकडून उद़्घोषणा झाली आणि त्याने दिलेल्या जुजबी माहितीनंतर 'एअर अरेबिया' चे विमान अखेर पहाटे सव्वा पाच वाजता हवेत झेपावले.


उत्साही प्रवाशांनी आता 'सेल्फी'चा आनंद घ्यायला सुरुवात केली. दोन-चार छायाचित्रांमध्ये विमानासह स्वतःची छबीदेखील बंदिस्त केली. काहींनी हवाई सुंदरीकडून हलका नाश्ता मागवून घेतला. तर काहींनी स्वतःसोबत आणलेले पदार्थ खायला सुरुवात केली. एव्हाना विमानातील दिवे मंद झाले. जसे विमान झेपावले तसे रात्रभर जागे असणारे प्रवाशी 'झोपावले.'  आता फक्त विमानाचा आवाज ऐकू येत होता. काही प्रवाशांची चर्चा आणि एखादी-दुसरी बेल. काहीवेळानंतर तेही सर्व शांत झाले. आता विमानाच्या आवाजात अनेक प्रवाशांचा एकसुरी घोरण्याचा आवाज मिसळललेला होता. अगदी 'आ वासून' काहीजण 'तानावर तान' घेत होते. या सर्व आलापी पाहून मला मजा वाटत होती. एस टी तील दृश्यापेक्षा हे तसे फारसे वेगळे नव्हते.

           विमानाच्या पंखावरील दिव्याच्या चमचमाटात  हिऱ्याचा भास होत होता. खाली जमिनीवरील आर्धवट निद्रीस्त असणाऱ्या गावांवर झालेली दिव्यांची पखरण स्पष्ट चित्रीत होत होती. अशा अनेक छबी चित्रफितीत बंदिस्त करण्यात मी गुंतलो होतो.  गुड माॕर्निंग' पुन्हा कप्तानाने उद़्घोषणा करुन उतरण्याची नियोजित वेळ सांगितली. यावेळी ६-१४ वाजले होते.

गर्भातून नवा जीव बाहेर पडावा तसा पूर्वेला आकाश फुटून त्यातून लाल गोळा म्हणजेच आमचा 'सूर्याबा' बाहेर येत होता. त्याची आगाऊ साक्ष फाकलेल्या आकाशातून पसरलेला संधीप्रकाश देत होता. निळ्याशार आकाशरंगी केसरमिश्रित छटा सूर्याबाची चाहूल देत होत्या. काहीवेळानंतर सुरुवातीला 'वालुकामय समुद्र' दिसला. काही पळ पळाल्यानंतर 'मरुभूमी'तील गावे दिसू लागलीत. अगदी कागदावर रेखाटल्याप्रमाणे!

         आता ७-४७ वाजले होते. 'शारजहा' विमानतळावरील धावपट्टीला विमानाचे 'चाकेरी पाय' लागले होते. तशा तानी प्रवाशांच्या सर्व ताना गायब झाल्या होत्या. 'आ वासलेली' तोंडं जागेवर मिटली होती. जो तो उतरण्याच्या प्रयत्नात जागेवरच बसून होता. शेवटी सर्व प्रवाशी उतरले.

       पूर्वेला आमचा सूर्याबा बऱ्यापैकी वर आला होता. आता प्रवाशी विमानासोबत 'सेल्फी' काढण्यात गुंतले होते. यानंतर विमानतळावरील सोपस्कार पूर्ण झाला. प्रशस्त रस्ते, मोठाल्या इमारती, नजर जाईपर्यंत दिसणारी मरुभूमी दाखवत 'लेफ्ट हँडेड ड्रायव्हींग' वातानुकुलित गाडी दुबईकडे धावत होती.



©️ प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी