दोडामार्ग : दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष व शिवसेना दोडामार्गचे शहरप्रमुख तथा शहरातील अत्यंत हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लवू मिरकर ( वय ५५) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.
गोवा बांबुळी येथे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या अचानक जाण्याने मिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण दोडामार्ग बाजारपेठ व शहरासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. लवू मिरकर हे गेली कित्येक वर्षे दोडामार्ग शहराच्या जडण घडणीत अग्रस्थानी होते. सामाजिक, राजकीय आणि व्यायसायिक क्षेत्रात त्यांचं नेहमी मोठ योगदान असायचं. दोडामार्ग व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं. कोरोना सारख्या काळात प्रशसनासोबत त्यांनी शहरातील व्यापाऱ्यासाठीही काम केलं. आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांचे ते अत्यंत जवळचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. तर दोडामार्ग शहरात येथील बहुतांश उपक्रम आणि कार्यक्रमात त्यांचं योगदान असायचं. पिंपळेश्र्वर सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातूनही ते सर्व कार्यक्रमात आघाडीवर असायचे. त्यांच्या अशा अवकाळी जाण्याने शहर वासियातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाच्छत पत्नी, दोन मुली, भाऊ, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. अवघ्या महिन्याभरात मातोश्रींचे निधन झाले होते. सिद्धीविनायक कला क्रीडा मंडळ दोडामार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. माजी नगरसेविका सुषमा मिरकर यांचे ते पती होत. शहरातील कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.