दोडामार्ग : लोक वर्गणीतून रुग्णवाहिका ही संकल्पना एका शासकीय डॉक्टरने मांडावी आणि अवघ्या एका तासात ७ लाखाहून अधिक लोकवर्गणी जमा व्हावी हे जर कुणाला सांगितलं तर त्यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण ही किमया दोडामार्ग वासियानी घडवून आणली आहे. देवदूत बनून निस्वार्थी रुग्णसेवा देणाऱ्या दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर एवाळे यांनी फक्त हाक दिली आणि दोडामार्ग वासियांनी करून दाखवले.
स्वतः डॉक्टर, राजकीय नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, शिक्षक, उद्योजक, बिल्डर, ठेकेदार नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते आणि दोडामार्ग मधील सामान्य नागरिक यांनी पुढाकार घेत एका तासात ७ लाखांहून अधिक लोकवर्गणी गोळा केली अजूनही ८ लाखांची वर्गणी गोळा करायची असून समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी योगदान द्यावं असं आवाहन डॉ. एवले यांनी केलं आहे._
समाजात एखाद चांगलं काम करायचं असेल, त्याचा उद्देश निर्मळ असेल तर समाज काय करू शकतो हेच यानिमित्तान पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर एवाळे यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेडसावणाऱ्या रुग्णवाहिका सेवेवर एक उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आणखी एक हक्काची आणि ती लोकांची रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध असावी अशी संकल्पना दोडामार्ग तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, उद्योजक, वकील, ठेकेदार सरपंच अशा सर्वच क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टर एवळे यांनी सोमवारी सकाळी एक फोन केला. मला आपल्याशी महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचं आहे आपण दुपारी साडेबारा वाजता रुग्णालयाच्या सभागृहात उपस्थित राहा एवढंच आवाहन केलं.
ही दिलेली हक्काची हाक त्यांनी दिलेल्या दोडामार्ग मधील निस्वार्थी आरोग्य सेवेची पोहच पावती की काय, ठीक १२.३० ला सर्वजण या सभागृहात उपस्थित झाले. तालुक्यातील सर्व क्षेत्रात वावरत असणाऱ्या शेकडो जणांनी डॉक्टरांच्या एका फोन वरून या सभेला उपस्थिती दर्शवली आणि एक वेगळा आदर्श अख्या जिल्ह्यात घालून दिला. डॉक्टर एवले यांनी नेमक का बोलवले आहे या प्रश्नाचे सारेच उत्तर शोधत होते, मात्र डॉक्टर यांनी ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन परिस्थितीत काही वेळा रुग्णांचे गैरसोय होते त्यावेळी आपण हतबल असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य तालुक्यात आठ ते दहा तरी रुग्णवाहिका या विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी खाजगी उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र दोडामार्ग आपला दोडामार्ग तालुका असा आहे जिथे सर्वात जास्त रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. मात्र याच तालुक्यात शासकीय रुग्णवाहिका वगळता अन्य रुग्णवाहिकांची उपलब्धता नाही. त्यामुळे आपल्या तालुक्यात सुद्धा लोकांनी लोकांच्या सोयीसाठी लोक वर्गणीतून हक्काचे एखादी रुग्णवाहिका असावी. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ती वापरता येईल अशी भूमिका सर्वांसमोर मांडली.
नुकतीच घडलेली घटना समोर ठेवत अती गंभीर रुग्ण अन गरोदर माता यांना आपण कितीही म्हटलं तरी पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका सोडून दुसऱ्या खाजगी गाडीने न्यायचं म्हटलं तरी ते त्या रुग्णासाठी उचित नसते. यामुळे आपल्याकडे रुग्णसेवेसाठी आवश्यक असणारी हक्काची रुग्णवाहिका उपलब्ध असेल तर त्याचा संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील जनतेलाच उपयोग होणार आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण ज्या ज्यावेळी हाक दिली त्या त्या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्यासाठी साऱ्यांनी हातभार लावला. म्हणूनच मी हक्काने आपल्याकडे रुग्णवाहिकेसाठी हृदयापासून हाक देत असल्याचे सांगितले.
डॉक्टरांचे हे म्हणणे ऐकून घेताच या बैठकीला उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ आपली हक्काची रुग्णवाहिका उपलब्ध झाली पाहिजे याबाबत निर्णय घेतला. ज्या रुग्णवाहिकेवर फक्त लोकांचा हक्क असेल अशी रुग्णवाहिका लोकवर्गणीतून येत्या महिन्याभरात उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय यावेळी झाला. हा फक्त निर्णय न घेता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेतेमंडळी लोकप्रतिनिधी,डॉक्टर, वकील, पत्रकार, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, यांनी एक एक करत मदत जाहीर करत गेले आणि ही रुग्णवाहिकाच्या खरेदीसाठी सुरू झालेली चळवळ अवघ्या तासाभरात ७ लाखाहून अधिक लोकर्गणी उभी राहिली. या बैठकीत सुसज्ज अशी नवीत रुग्णवाहिका खरेदी करणे व तिच्या पुढील वर्षासाठी चालकासह मेंटेनन्स व डिझेल खर्च यासाठी सुद्धा लागणारे एकूण खर्च सुमारे 15 लाख रुपये उभारण्याचा निर्धार करण्यात आला. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे आपलं रुग्णालय आहे आणि येथील तालुक्यातील जनतेला सुद्धा या रुग्णालयातील उपचाराशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्याला जमेल ती मदत या कार्यात करावी असा मनोदय सर्वांनीच व्यक्त केला.
सर्वप्रथम जमलेल्या लोक वर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करणे व ती दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातूनच लोकसेवेसाठी कार्यरत ठेवणे व त्यानंतर या रुग्णवाहिकेचा मेंटेनन्स व इतर बाबी व ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातही आवश्यक बाबी उभारणं अशी कामे करण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा विनिमय करण्यात आला. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेने या आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाच्या चळवळीत जमेल तसं सहकार्य करून योगदान द्याव, असे आव्हान दोडामार्ग ग्रामीण मुलाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर यांनी केल आहे.
यावेळी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, प्रा. संदीप गवस, उद्योजक विवेकानंद नाईक, शिवानंद भोसले, प्रेमानंद देसाई, एकनाथ नाडकर्णी, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, बाबुराव धुरी, बाळा नाईक, प्रवीण गवस, नितीन मणेरिकर, गणेशप्रसाद गवस, राजेंद्र म्हापसेकर, शैलेश गोवेकर, उदय पास्ते, वैभव इनामदार, सुधीर दळवी, बाबा टोपले, रामदास मेस्त्री, दादा पालेकर, ऍड. सोनू गवस, दाजी नाईक, विश्राम घोगळे, डॉ.उमेश देसाई, डॉ. महेश पवार, डॉ. कृष्णा कविटकर, डॉ. विश्वजीत सावंत, वैभव इनामदार मुख्याध्यापक संतोष घोगळे, शिक्षक संघटनेचे गुरुदास कुबल, विठ्ठल गवस, दयानंद नाईक, महेश काळे, आनंदा बामणेकर, राजेश प्रसादी, सुधीर पनवेलकर, रेश्मा कोरगावकर, संतोष मोर्ये, सुनील गवस, प्रवीण गवस, मायकल लोबो, स्वप्नील देसाई, लवू परब, डॉ. सोपान जाधव, राजेश जुवेकर, दीपक बुगडे, मोहन गवंडे, पत्रकार संदीप देसाई,सुहास देसाई, तेजस देसाई, रत्नदीप गवस, संदेश देसाई, ओम देसाई, सुमित दळवी, गणपत डांगी, लवू परब, गोविंद शिरसाठ, भूषण सावंत, प्रतीक राणे आदी उपस्थित होते.
यांचं योगदान लाखमोलाच..
शिवानंद भोसले १ लाख रुपये
दोडामार्ग शिवसेना (उ. बा. ठा. ) ५१ हजार
प्राथमिक शिक्षक वर्ग तालुका दोडामार्ग ५० हजार
बाळासाहेबांची शिवसेना ५० हजार
चेतन चव्हाण मित्रमंडळ ५० हजार
सरपंच संघटना दोडामार्ग ३६ हजार
डॉक्टर असोसिएशन दोडामार्ग ३० हजार
प्रेमानंद देसाई २५ हजार
विवेकानंद नाईक २५ हजार
दत्त्ताराम टोपले २५ हजार
एकनाथ नाडकर्णी २५ हजार
वकील संघटना दोडामार्ग २५ हजार
सूर्यकांत गवस २५ हजार
शैलेश गोवेकर २५ हजार
राष्ट्रवादी काँग्रेस दोडामार्ग आणि अर्चनाताई घारे परब २५ हजार
मराठा क्रांती मोर्चा २५ हजार
पत्रकार समिती दोडामार्ग २० हजार
राजेंद्र म्हापसेकर ११ हजार
नितीन मणेरीकर ११ हजार
विठोबा पालयेकर १० हजार
सुधीर दळवी १० हजार
रेश्मा कोरगावकर १० हजार
मोहन गवंडे १० हजार
मायकल लोबो यांचा पुरुष बचत गट १० हजार
दोडामार्ग तालुका स्वामी समर्थ मंडळ १० हजार
स्नेहबंध ग्रुप दोडामार्ग १० हजार
दयानंद नाईक १० हजार
संतोष रघुनाथ शेटवे १० हजार शशिकांत बाबल नाईक १० हजार
अजूनही ८ लाखांची आवश्यकता...
लोक वर्गणीतून रुग्णवाहिका ही प्रत्येक दोडामार्ग वासियांची गरज असून, अजूनही आपल्याला ९ लाख रुपये लोक वर्गणीची आवश्यकता आहे. शेकडो जण लोक वर्गणी देऊन आरोग्य क्षेत्रातील या विधायक कार्यासाठी आपले योगदान देण्यास उत्सुक आहेत. ज्या दानशूर महनीय व्यक्तींना या आरोग्य उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवायचा आहे ज्यांना लोक वर्गणी द्यायची आहे, त्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे-९७६३१३२२६२ किंवा पत्रकार संदीप देसाई ९४२३३२११२६, तेजस देसाई ९४२३५१८९०८ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.