DIWALI OFFER | 'या' कार्सना दिवाळीत आहे तगडी ऑफर !

भारतात वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कार उत्पादक कंपन्या सज्ज
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 20, 2022 18:11 PM
views 358  views

ब्युरो रिपोर्ट : या सणासुदीच्या हंगामात भारतात आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी जर्मन वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने दिवाळी डिस्काउंट ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीने दिवाळीच्या आधी टायगून आणि वर्टस या कार्सवर तगडा डिस्काउंट जाहीर केला आहे. फोक्सवॅगनची नवीन कार खरेदी करताना ग्राहकांना तब्बल १ लाख रुपयांहून अधिक लाभ होऊ शकतो. तुम्ही जर या दिवाळीत एखादी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Taigun SUV आणि Virtus सेडान कारचा तुम्ही विचार करू शकता. कारण कंपनीने या दोन गाड्यांवर डिस्काउंट जाहीर केला आहे. विशेष म्हणजे टायगून एसयूव्ही देशातली सर्वात सुरक्षित कार आहे.



फोक्सवॅगन कंपनीने पहिल्यांदाच त्यांच्या टायगून एसयूव्हीवर डिस्काउंट जाहीर केला आहे. या कारला अलिकडेच ग्लोबल एनसीएपी क्रॅठ टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळालं आहे. ही भारतातल्या रस्त्यांवर धावणारी सर्वात सुरक्षित कार आहे. कंपनीने या कारच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सच्या आधारावर १,००,००० रुपयांहून अधिक डिस्काउंट जाहीर केला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ११.५५ लाख रुपये ते १८.७० लाख रुपये इतकी आहे.



Volkswagen Taigun या कारचं 1.5L GT MT व्हेरिएंट खरेदी केल्यास तुम्ही १,०५,००० रुपयांची बचत करू शकता. कंपनी या कारवर ५०,००० रुपयांचे कॅश बेनिफिट्स देत आहे. तसेच यावर २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रुपयांचा रॉयल्टी बोनस आणि २५,००० रुपयांचं ४ वर्षांसाठीचं कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस पॅकेज कंपनीने या कारवर देऊ केलं आहे.


टायगून एसयूव्हीच्या १.० लीटर टीएसआय व्हेरिएंटवर एकूण ७०,००० रुपयांचा लाभ मिळेल. यामध्ये इतर बेनिफिट्सशिवाय २५,००० रुपयांची रोख सूट देखील मिळेल. या कारच्या १.५ लीटर व्हेरिएंटच्या ऑटोमॅटिक व्हर्जनवर ५५,००० रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस, १०,००० रुपयांचा रॉयल्टी बोनस आणि २५,००० रुपयांचं कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.



या दिवाळीत फोक्सवॅगन वर्टस या सेडान कारवर देखील कंपनीने डिस्काउंट जाहीर केला आहे. कंपनी या कारच्या Comfortline आणि Highline या दोन व्हेरिएंटवर ३०,००० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. तर या कारच्या Topline आणि टॉप-ऑफ-रेंज 1.5L GT व्हेरिएंटवर १०,००० रुपयांचे बेनिफिट्स देत आहे. वर्टस या कारची एक्स शोरूम किंमत ११.३२ लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १८.४१ लाख रुपये इतकी आहे.