
देवगड : केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील संशोधकांच्या चमूने नुकताच पश्चिम घाटातून दोन नव्या टाचण्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. या टाचण्या प्रोटोस्टिक्टा (Protosticta) या जातीच्या असून त्यांना मराठीत छायासुंदरी असे संबोधले जाते. केरळ मधील आर्यानाड गावातून प्रोटोस्टिक्टा सँग्विनीथोरॅक्स (Protosticta sanguinithorax) अर्थात किरमिजी छायासुंदरी आणि महाराष्ट्रातील आंबोली-दोडामार्ग परिसरातून प्रोटोस्टिक्टा शांभवी (Protosticta shambhaveei) अर्थात कोकण छायासुंदरी या दोन टाचण्या जगासमोर आल्या आहेत.हा सुमारे ३४ पानी शोधनिबंध १५ ऑगस्ट रोजी झूटॅक्सा या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला.महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबोली आणि दोडामार्ग तालुक्यामधील वानोशी या गावातून प्रोटोस्टिक्टा शांभवी या नवीन टाचणीचा शोध लावला गेला आहे. २०२१ साली आंबोली येथील प्रसिद्ध फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले आणि देवगड येथील प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्र तज्ञ डॉ.दत्तप्रसाद सावंत यांना ही टाचणी सापडली होती.त्यावेळी ही टाचणी म्हणजे १९२२ साली फ्रेसर या ब्रिटिश शास्त्रज्ञाने केरळ राज्यातून शोधून काढलेली प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा (Protosticta sanguniostigma) (मराठी नावः लाल ठिपक्याची छायासुंदरी) असावी या कयासाने त्यांनी महाराष्ट्र राज्यातील पहिली नोंद केली होती. मात्र निसर्ग अभ्यासक वानोशी फॉरेस्ट होमस्टे येथील अभिषेक राणे यांच्या सहकार्याने त्यांनी या टाचणीचे आणखी नमुने गोळा केले आणि बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स मधील डॉ.कृष्णमेघ कुंटे यांच्या प्रयोगशाळेत त्यावर अधिक अभ्यास केला.आकारशास्त्र आणि जनुकीय अभ्यासानंतर ही टाचणी प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा पेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले.आंबोली मधील हिरण्यकेशी येथून या टाचणीची पहिली नोंद झाल्याने या टाचणीला भगवान शंकराशी निगडित नाव दिले गेले. "शंकराला आवडणारी ती" किंवा "पार्वती" म्हणून शांभवी असे या टाचणीचे शास्त्रीय नामकरण करण्यात आले. कोकणाच्या जैवविविधतेचा सन्मान म्हणून कोकण शेंडोडॅमसेल असे इंग्रजी नावही या नवीन प्रजातीला देण्यात आले.
दुसरी नवीन टाचणी ही केरळ राज्यातील तिरूवनंतपुरम जिल्ह्यातील आर्यानाड गावातून शोधली गेली. थ्रिसूर येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. विवेक चंद्रन आणि निसर्ग अभ्यासक रेजी चंद्रन यांनी प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा सारखी दिसणारी परंतु छातीवर किरमिजी रंगाचे पट्टे असणारी एक टाचणी गेली काही वर्षे छायाचित्रित केली होती. मात्र डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या
प्रयोगशाळेत सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांना असे आढळले की ही टाचणीदेखील इतर सर्व टाचण्यांपेक्षा खूप वेगळी आहे. आकारशास्त्र आणि जनुकीय अभ्यास केल्यानंतर डॉ. चंद्रन आणि डॉ. सावंत यांनी एकत्र येत या दोन्ही नवीन प्रजातींवर शोध निबंध प्रसिद्ध करण्याचे ठरवले. पुणे येथील पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. पंकज कोपर्डे यांनी जनुकीय अभ्यास करून कोकण छायासुंदरी ही इतरांपेक्षा ११% तर किरमिजी छायासुंदरी ही १०% वेगळी असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. छातीवर असलेल्या किरमिजी रंगाच्या पट्ट्यामुळे या टाचणीला 'सँग्विनीथोरॅक्स' असे नाव दिले गेले ज्याचा शब्दशः अर्थ तांबूस रंगाची छाती असा होतो. इंग्रजीमध्ये या टाचणीचे बारसे क्रिमझन शेंडोडॅमसेल असे करण्यात आले आहे. या शोधामुळे तब्बल १०३ वर्षांनंतर प्रोटोस्टिक्टा सँग्विनोस्टिग्मा या गटात नवीन टाचण्यांची भर पडली आहे.
डॉ. विवेक चंद्रन हे पी.एच.डी. असून त्यांनी केरळ आणि इतर भागातून चतुरांच्या अनेक नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. रेजी चंद्रन हे निसर्ग अभ्यासक असून व्यावसायिक छयाचित्रकार आहेत. डॉ. दत्तप्रसाद सावंत हे वैद्यकीय व्यावसायिक असून प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्र तज्ञ आहेत. हेमंत ओगले हे प्रसिद्ध फुलपाखरू तज्ञ व निसर्ग अभ्यासक आहेत. डॉ. पंकज कोपर्डे हे पुणे येथील पर्यावरण शास्त्रज्ञ असून सहाय्यक प्राध्यापकही आहेत. अभिषेक राणे हे निसर्गअभ्यासक आहेत. डॉ. कृष्णमेघ कुंटे हे जगप्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ असून बंगळुरू येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
छायासुंदरी किंवा शॅडोडॅमसेल टाचण्या या दात जंगलातील छोट्या झऱ्यांजवळ दिसून येतात. या टाचण्या पर्यावरण संवेदनशील असून त्यांना प्रजनन करण्यासाठी शुद्ध पाणी तसेच प्रदूषणविरहित वातावरणाची गरज असते. त्यामुळे या टाचण्यांचा आढळ असणाऱ्या जागा या पर्यावरणदृष्ट्या संपन्न तसेच संवेदनशील म्हणून समजल्या जातात. या शोधाच्या निमित्ताने पश्चिम घाटाची जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. (डॉ. विवेक चंद्रन, केरळ)
रंगातील साम्यामुळे या दोन्ही प्रजाती याआधी नवीन म्हणून ओळखल्या गेल्या नव्हत्या. मात्र त्यांचा सखोल आकारशास्त्रीय अभ्यास करूनच या प्रजाती एक नसून संपूर्ण घाटात १९२२ सालची मूळ टाचणी धरून एकूण ३ टाचण्या आहेत हे सिद्ध झाले आहे. या छोट्या कीटकांचा माणसाला खूप मोठा उपयोग आहे, कारण चतुर आणि टाचण्या डासांना आणि त्यांच्या अळ्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात. (डॉ. दत्तप्रसाद सावंत, सिंधुदुर्ग)