सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्गचे दाेन मातब्बर नेते. कोकणचं देशात अन् राज्यात नेतृत्व करणारी ही धुरंधर राजकीय मंडळी. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. आज या दोन नेत्यांची झालेली भेट कोकणवासियांसाठी विशेष होती. तब्बल एका दशकानंतर केसरकरांनी राणेंच्या 'ओम गणेश' बंगल्यावर जाऊन त्यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. राज्यातील राजकीय बदलानंतर हे दोन नेते एकत्र आल्यानं 'नांदा सौख्य भरे' अशी भावना सिंधुदुर्गवासिय व्यक्त करत असून नव्या राजकीय इनिंगचा हा 'श्रीगणेशा' मानला जात आहे.
सुरुवातीच्या काळात एकत्र असणारे हे नेते राजकारणाच्या एका टप्प्यावर एकमेकांच्या विरोधात होते. आजच्या भेटीनंतर हे कुणाला पटेल न पटेल. पण, 2014 च्या निवडणुकीपूर्वी केसरकर आणि राणे यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाला होता. राजकीय दहशतवादाचा मुद्दा पुढे करत केसरकरांनी राणेंविरूद्ध संघर्ष केला होता. उद्धव ठाकरेंच मन जिंकत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राणेंच्या पराभवासाठी केसरकर अग्रस्थानी येऊन काम करत होते. पहिल्यांदा लोकसभेत तदनंतर विधानसभेत राणेंना त्याचा फटकाही बसला. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर राणे-केसरकर एकत्र आले होते. त्यात आज तब्बल एका दशकानंतर केसरकर यांनी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जाऊन त्यांची घेतलेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.
मुळात आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या राणे आणि केसरकरांमधली मतभेदांच प्रमुख कारण ठरलं ते रेल्वे टर्मिनस. हे टर्मिनस कुठं व्हावं ? यावरून सुरुवातीपासूनच वाद रंगला होता. टर्मिनस मडूरा येथे व्हावं यासाठी राणे आग्रही होते. तर सावंतवाडी मळगाव स्थानकासाठी केसरकर अडून बसले होते. दोन राजकीय नेत्यांच्या चढाओढीच्या राजकारणात हा वाद चांगलाच रंगला होता. त्यातच 2014 ला देशात आणि राज्यात भाजपा - शिवसेनेची सत्ता आली. यावेळी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या नारायण राणेंना बाजूला ठेऊन सावंतवाडी टर्मिनसचा भूमिपूजन सोहळा पार पाडला गेला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सोहळ्यास उपस्थित होते. परंतु, नऊ वर्षे होऊन देखील सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्णत्वास आलेल नाही. एवढंच नाही तर आता हक्काच्या रेल्वेला थांबा मिळावा म्हणून सावंतवाडीकरांवर संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
कालच रविवारी या संदर्भात सावंतवाडीत झालेल्या बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. याआधी माजी आमदार जयानंद मठकर यांच्या नेतृत्वाखाली दीपक केसरकर यांनी देखील रेल्वे टर्मिनससाठी लढा उभारला होता. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर केसरकर गप्प का? असा सवाल त्यांना समितीनं केला होता. त्याच पार्श्वभूमीवर राणे आणि केसरकरांची झालेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्यातील या भेटीकडे सावंतवाडीकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्यात आता नारायण राणे हे भाजपात असून केंद्रीय मंत्री आहेत. तर दीपक केसरकर शिवसेनेचे राज्यातील महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यामुळे आपापसातील मतभेद मिटवून एकत्र आलेल्या या नेत्यांनी कोकणच्या विकासाला प्राधान्य देताना सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न देखील निकाली काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.