'क्रोकोडाईल मॅन' बबन रेडकर !

364 मगरी पकडण्याचा विक्रम !
Edited by: विनायक गांवस
Published on: September 03, 2025 12:44 PM
views 191  views

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलाव येथील नागरिकांत भितीच वातावरण निर्माण करणारी मगर अखेर जेरबंद झाली आहे. वनविभागाच्या जलद कृती दलामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले आहे. या पथकाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. तब्बल ३६४ मगरी जेरबंद करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे‌

रामचंद्र उर्फ बबन रेडकर हे वनविभागात वनसेवक म्हणून रुजू झाले होते. सुरुवातीची काही वर्ष नरेंद्र उद्यानात त्यांनी सेवा दिली. नोकरीत कायम झाल्यावर ते वनसेवक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर तब्बल ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या वर्षी ते वनविभागाच्या सेवेतून निवृत्ती झाले. आपल्या कार्यकालात त्यांनी वनसेवक म्हणून सेवा देत असतानाच तत्कालीन वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य प्राण्यांना रेस्क्यू करण्याचे प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी अनेक प्रकारच्या सापांना तसेच इतर वन्य प्राण्यांना मुख्यत्वे बिबटे, मगरी, अजगर, नाग अशा वन्य प्राण्यांना रेस्क्यू केले आहे. अनेक जखमी पशुपक्ष्यांना त्यांनी जीवदान दिले आहे. 

आज मोती तलावात पकडलेली मगर त्यांनी पकडलेली तब्बल ३६४ वी मगर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या याच अनुभवाचा व कार्याची दखल घेत सेवानिवृत्तीनंतर त्यांना वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याच जलद कृती दलाच्या माध्यमातून उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या रेस्क्यू टीम्ससह ते सध्या वन्य प्राण्यांना जीवदान देण्याचे काम करीत आहेत. यात रेस्क्यू टीमचे प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर यांची साथ त्यांना लाभत आहे.