
सावंतवाडी : शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राला कितपत ज्ञात आहे अन् असेल तर तो कोणता ? हा प्रश्न आहे. याला कारण म्हणजे काही अभ्यासकांनी शंभुराजांची मांडलेली प्रतिमा. ते कसे चुकीचे होते, अविचारी होते हे अनेकदा इतिहासातून मांडलं गेलं आहे. राजांचा करारी बाणा, संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, लहान वयात लिहीलेला बुधभूषण ग्रंथ, अष्टप्रधान मंडळात काहींना हत्तीच्या पायी दिलेली शिक्षा अन् छत्रपतींचे वारस अशी अनेक कारणं याला आहेत. काही अभ्यासकांनी बखरींचा, ऐतिहासिक नोंदींचा संदर्भ घेत शंभूराजेंचा पराक्रम सांगणारा ज्वलंत इतिहास नाटक, सिनेमा, कथा, कादंबरीतून मांडला आहे. यातच काल १४ फेब्रुवारीला छ. संभाजी महाराजांवर आधारित ''छावा'' चित्रपट देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा ज्वलंत इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळे अनेक दशकं झाकला गेलेला संभाजी राजांचा इतिहास आता देशाला नव्हे तर जगाला ज्ञात होणार आहे.
हा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीचे रूपांतर आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. अभिनेता विकी कौशलने यात संभाजी राजांची भूमिका बजावली आहे. त्यांच्या अभिनयातली मेहनत आणि समर्पण चित्रपट पहाताना स्पष्ट दिसून येते. देशभरातून चांगला प्रतिसाद सिनेमाला मिळत आहे. यात अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या केलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत. अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका तितक्याच ताकदीनं साकारली आहे. ए.आर. रहमान, वैशाली सामंत यांचे संगीत, पार्श्वसंगीत चित्रपटाची एक वेगळी बाजू उलगडते. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं रायाजीची भूमिका साकारली आहे. नीलकांती पाटेकरने धाराऊ तर शुभंकर एकबोटेनं धनाजी ही भूमिका साकारली आहे. सारंग साठ्ये गणोजी शिर्के, सुव्रत जोशीने कान्होजीची भूमिका साकारली आहे. मनोज कोल्हटकर, आस्ताद काळे आदींसह अनेक मराठमोळी मंडळी या सिनेमात आहेत.
संभाजीराजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळंतपणानंतरच्या आजारपणात मृत्यू झाला होता. मातृसुख त्यांच्या नशिबी नव्हतं. धाराऊनं राजांना वाढवलं. या सिनेमात मातृप्रेमावर अतिशय उत्तमरित्या प्रकाशझोत टाकला आहे. सावत्र आई सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या पश्चातील राजकारण हे या सिनेमात दाखवल आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना आलेला कमालीचा वेग, राजाराम महाराजांना गादीवर बसवण्यासाठीचे प्रयत्न दाखवलेत. सोयराबाईंचं राजाराम महाराजांप्रती असणार पुत्रप्रेम दाखवताना शंभूराजांचा चित्रीत केलेला एक सीन त्यांच्या नशिबी नसलेल्या मातृप्रेमाची उणीव दाखवणारा अन् सोयराबाईंच्या पुत्रप्रेमाचं कौतुक करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह बोलणारे बालपणातील संभाजीराजे दाखवले गेलेत. माँसाहेब, आबासाहेब अशा हाका देणारे हे सीन प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारे आहे. मॉंसाहेबांना कसं ओळखू....? हा चित्रपटातील शेवटही तसाच डोळ्यातून अश्रू आणणारा आहे.
सरतेशेवटी न बघवणारा असा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतोच. अकबराला संरक्षण देत आलमगीर बादशहा औरंगजेबाला ठार करायचं या दृष्टीने शंभूराजे आक्रमणं करणार होते. त्यासाठी मुघलांना बेसावध ठेवत आपल्या महत्त्वाच्या सरदारांना शंभूराजेंनी बैठकीसाठी कोकणात बोलावलं. संगमेश्वर सरदेसाई वाड्यात राजे अन् काही सरदार होते. यातच वतनासाठी फितूर झालेले महाराजांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रू सैन्यात चकमक झाली. पाच हजार मुघल सैन्यापुढे मराठ्यांचे १५० मावळे प्राणपणाने लढले. पळून न जाता शंभुराजेंसह मावळ्यांनी गनिमांना ठेचत शत्रू सैन्य ठार केलं. मात्र, हजारोंच्या संख्येने कैद करण्यासाठी आलेल्या शत्रूने अखेर संभाजीराजांना जिवंत पकडलं. साखळदंडान बांधून ठेवलं. स्वकीयांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजीराजे व कवी कलश औरंगजेबाच्या तावडीत सापडले. यानंतर औरंगजेबाने त्यांना तब्बल 40 दिवस मरण याताना दिल्या. कातडी सोलली, डोळे फोडले, जीभ कापली, जखमांवर मीठ चोळले. असह्य यातना शंभूराजेंनी सहन केल्या पण मुखातून एक शब्दही निघाला नाही. शेवटी धर्मांतर करण्यासाठी औरंग्याने राजांवर दबाव टाकला.
मात्र, शेवटपर्यंत संभाजी राजेंनी स्वराज्य आणि धर्माप्रती असलेली आपली निष्ठा सोडली नाही. यामध्ये औरंगजेब संभाजी राजेंना आवाहन करतो 'बस, तुम्हे अपना धर्म बदलना होगा'...! यावर शंभूराजेंच उत्तर येतं ''हमसे हाथ मिलालो, मराठोंकी तरफ आजावो, जिंदगी बदल जाऐंगी और धर्म भी नहीं बदलना पडेगा''...! या एका वाक्यातून खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शूरवीर अशा धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना अखेर 11 मार्च 1689 रोजी वीरमरण आलं. हा चित्रपट संपताच काही सेकंद चित्रपटगृह सुन्नं होत, स्मशान शांतता पसरते. अन् मागून प्रेक्षकांतून एक आवाज येतो. ''छत्रपती संभाजी महाराज की''....अन् प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे राहतात.