आज आयुष्यातील एका खास माणसाबद्दल बोलायचे आहे... निमित्त आहे त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे... तारीख ही खास आहे, पाच मे म्हणजे 5.5.23 म्हणजेच 5.5.5 की..... म्हणजे 23 ची बेरीज ( 2+3=5) आणि ह्या दिवशी माझ्या खास मित्राचा 50 वा वाढदिवस...
अगदी 5 चा योगायोग....त्याच्या गाडीचा नंबरही 555 असतो....तसे त्याच्या आयुष्यात सगळ्या खास तारखाच आल्यात...सात जन्माची सोबतीण असणाऱ्या त्याच्या अर्धांगिनीची जन्मतारीख सात जुलै म्हणजे 7.7. तर सिविल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलेल्या सुपुत्राची सौरभची जन्मतारीख चार एप्रिल म्हणजे 4.4. आणि हो... ज्या विचारधारेच्या प्रेमात व आचार विचारात त्याने तारुण्यापासुन स्वतःला झोकुन दिले ती म्हणजे स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची विचारधारा, भारतीय जनता पार्टीची विचारधारा...त्याच अटलजींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला, अनेक क्षेत्रात पारंगत असणाऱ्या त्याच्या सुकन्येचा सानियाचा जन्म...असे अनेकानेक योगायोग त्याच्या आयुष्यात आहेत.
अगदी शुन्यातून स्वतःच्या मेहनतीने ज्याने आज समाजात आपले स्थान निर्माण केले व प्रत्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्याला स्वतः त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात अश्या माझ्या मित्राचा प्रभाकर सावंतचा आज वाढदिवस. आज राजकीय वर्तुळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे नाव आदराने घेतले जाते. मग मराठा मोर्चाचे नेतृत्व असो किंवा भाजप, सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्हा हे पद असो किंवा जिल्हा उपाध्यक्ष पद...त्याने अगदी झोकुन देऊन भाजपचे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला सुदृढ बनविण्यासाठी ज्या काही मंडळींनी काम केले त्यात याचे नाव अगदी वरच्या फळीत घेतले जाते. ही झाली एक बाजु, पण दुसरी आहे एका संवेदनशील लेखकाची, कवीची.. विविध विषयावरील त्याचे लेख अनेक वृत्तपत्रात वाचायला मिळाले आहेत. बाबल्या ह्या स्वयंनिर्मित पात्राद्वारे समाजातील अनेक गोष्टींवर लिहिलेले व्यंगात्मक लेख विशेष पसंद केले गेले. कित्येक गाजलेल्या मालवणी कविता याने रचल्या आहेत व ज्या बऱ्याच वेळा व्हाट्सअपच्या माध्यमातुन आपण वाचल्याही आहेत. पण दुर्दैवाने बऱ्याचदा खाली कवीचे नाव न टाकता फॉरवर्ड केलेली असते, त्यामुळे आपल्याला ही यांचीच कविता हे कळलेही नसेल. एक उत्तम निवेदक, लेखक व कवि मनाचा हा माणूस उदयोगधंदा म्हणुन रमतो मात्र दगड-मातीत... शिक्षणाने इंजिनिअर व व्यवसायाने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर.
इथंवरचा प्रवास खुप अवघड, प्रचंड मेहनतीचा होता. याचा जन्म झाला अगदी गरीब शेतकरी कुटुंबात जिथे पावसात छत्री, पायात चप्पल व शाळेचा नवीन गणवेष ही चैनीची गोष्ट वाटायची व कधीही मिळायची नाही. दोन किलोमीटरची अनवाणी पायपीट करुन सातवी पर्यंतचे शिक्षण गावीच केले व उत्तम मार्क्स मिळवून तालुक्यात अव्वल नंबरने उत्तीर्ण झाला आणि मुंबापुरीत ह्याचे पाऊल पडले 10×10 च्या काकांच्या घाटकोपर येथील चाळीच्या घरात...साल होते 1985. आमचा जवळचा नातलग असल्याने त्याचे आमच्याकडे विक्रोळीला बऱ्याच वेळा येणे व्हायचे. इयत्ता व वय सारखेच असल्याने त्याची व माझी चांगलीच मैत्री झाली जी आजतागायत कायम आहे. दहावी उत्तम मार्काने पास झाला. आजीला दैवकृपेने त्याच्या मयत आजोबांची सरकारी पेन्शन कित्येक वर्षाच्या प्रयत्नाने नेमकी त्याच वर्षी सुरु झाली आणि आजीने ठरविले मी माझ्या हुशार नातवाला ह्या पेन्शनमधुन खुप शिकवणार..इंजिनिअर बनवणार. गरीब, शेतकरी आई वडिलांच्या सुखी जीवनाच्या आशा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी, आजीने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, खुप शिकून मोठे होण्याच्या दुर्दम्य इच्छेने पुढील इंजिनियरिंग शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. कॉलेजजीवन तसे खुप कष्टप्रद गेले. गावाकडून येणाऱ्या मनिऑर्डरची वाट पाहण्यात गेले...खिशात पैसे जरी कमी होते गोड स्वभावाने मित्रांची कमी कधीच नाही पडली आणि तिथेच पुढील जीवनाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
गावी जाऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु केला. अनेक मित्र जोडले आणि हो वयाच्या अगदी बाविशीत प्रेमात पडुन छानशी जीवनसाथी शिल्पा वहिनींच्या रूपाने जीवनात आली. मुळात कवीमन असल्याने समाजातील लोकांसाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अटलजींच्या विचारधारेच्या प्रवाहात कधी पडला त्याचे त्यालाही कळले नाही आणि सुरु झाली राजकीय कारकीर्द...हुशार पण गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही अडचण येवू नये तसेच शिक्षण क्षेत्रात काही भरीव कामगिरी करावी ह्याच उद्देशाने कसाल शिक्षण संस्थेचा कारभार गेली कित्येक वर्ष काही जवळच्या मित्रांच्या मदतीने समर्थपणे हाताळत आहे..!!
बाळा....हे घरातील नांव...खर तर हेच नाव आम्ही जवळचे अजुनही घेतो. त्यामुळे प्रभाकर हे अजुन अंगवळणी पडलेले नाही. पण आज 50 वा वाढदिवस आहे. त्यामुळे नावाने हाक मारतो. तर मित्रा प्रभाकरा तुला 50 व्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.. !! तुझी राजकीय कारकीर्द व व्यवसाय दिवसेंदिवस बहरतच जावो, ह्याच शुभेच्छा....!
- सुनिल पाटकर
पोलिस पाटील, अणाव