BIRTHDAY SPECIAL | अजय गोंदावळे...एक हरहुन्नरी संघटक..!

पदरमोड करून सामाजिक उपक्रम राबवणारा भाजपचा सच्चा कार्यकर्ता
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 10, 2023 11:35 AM
views 362  views

सावंतवाडी शहरातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक, भाजपचे कुशल राजकीय संघटक, हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून अल्पावधीतच सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा आज वाढदिवस....



मान. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचे खंदे समर्थक असलेल्या श्री. गोंदावळे यांनी सावंतवाडी शहराची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्वाना सोबत घेऊन मजबूत राजकीय बांधणी करत स्वतःमधील राजकीय चुणूक दाखवून दिली आहे. 



एक बांधकाम व्यवसायिक म्हणून स्वतःच्या पायावर आज भक्कम उभे असलेल्या श्री. गोंदावळे यांचे बालपण छोटेखानी घरात आई-वडील आणि भांवडासोबत सामान्य परिस्थितीत गेले.


आज उच्चशिक्षित असलेल्या गोंदावळे यांचे शिक्षण मात्र सावंतवाडीत शासकीय शाळेतच झाले. सुरवातीपासूनच व्यवसाय आणि स्वतःच्या हिम्मतीवर मोठे होण्याची जिद्द मनात असलेल्या श्री. गोंदावळे यांना गरिबीमुळे सुरवातीच्या काळात मुंबई येथे खासगी नोकरी करणे भाग पडले. मात्र मनातील त्यांची सुप्त इच्छा त्यांना त्या नोकरीत समाधान देईना. "काही का होईना व्यवसायातून स्वतःला घडविणारचं..!", असे म्हणत त्यांनी मुंबईतील खासगी नोकरीवर पाणी सोडत आपली आवडती सावंतवाडी गाठली.

याठिकाणी आल्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायात आपले नशीब आजमावले. कुडाळ येथे स्वतःचा छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातील अनुभवातून त्यांनी मागे वळून न पाहता पुढे उद्योग व्यवसायात भक्कम पाय रोवले. आज एक यशस्वी बांधकाम व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख आहे.




राजकारणातील प्रवास..


अजय गोंदावळे यांचा राजकीय प्रवास पाहता अल्पावधीतच त्यांनी आपली राजकीय वाटचाल उभारली. त्यांच्या या राजकीय वाटचालीत त्यांना भक्कम साथ मिळाली ती खंदे राणे समर्थक असलेले सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष संज परब यांची. एका मोठ्या बंधूप्रमाणे ते नेहमी गोंदावळे यांच्यामागे सावलीसारखे उभे असतात.


श्री. परब यांच्या माध्यमातूनच आज गोंदावळे भाजपात सक्रिय आहेत. सुरूवातीला राजकारणाचा काहीही गंध नसतांना गोंदावळे हे मान. नारायण राणे यांच्या नेतृत्वावर फिदा होते. राज्यातील राजकारणातील त्यांचे निर्णय, त्यांची काम करण्याची धडाडी वृत्ती, करारी बाणा व कार्यकर्त्याबद्दल त्यांची असलेली तळमळ गोंदावळे यांना प्रचंड भावली. त्यामुळे आज त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करत असतांना आपल्याला आनंद होत असल्याचे ते अभिमानाने सांगतात.


एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी कधीच आपला बडेजाव केला नाही. आज श्रीमंतीमध्ये वावरत असताना सुरुवातीच्या गरीबीची जाण ते कधीच विसरले नाहीत, त्यामुळे गरीब, गरजू असलेल्या सर्वांना आर्थिक मदत करण्यासोबतच त्यांच्या वेळप्रसंगीही ते नेहमीच मदतीला धावतात. भाजपमध्ये त्यांना सावंतवाडी शहराची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी आजपर्यंत यशस्वीरित्या पार पडली आहे. पक्षाकडून कुठलीही मदतीची अपेक्षा न बाळगता स्वतःची पदरमोड करून आजपर्यंत त्यांनी यशस्वी उपक्रम राबवले आहेत.



पक्षीय कुठलीही जबाबदारी त्यांनी झटकली नाही. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी आजपर्यंत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात विरोधी पक्षात असताना त्यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवला. शहरातील नागरिकांचे प्रश्न हाताळताना शहरातील नगरपालिकेतील सत्तेचा उपयोग करून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.

आजही ते शहरातील विविध प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यावर नेहमी सक्रिय असतात. कोरोना काळातील त्यांची सामाजिक बांधिलकी पाहता एखाद्या मोठ्या नेत्यालाही लाजवेल, अशीच होती.



कोणत्याही व कधीही कामाची प्रसिद्धी न करता त्यांनी या काळात अनेकांना मदतीचा हात पुढे केला. जवळपास पाच लाख रुपयाहून अधिक रुपयांचे धान्य त्यांनी गरजू लोकांना वाटप केले. पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना मदतकार्य केले. सॅनिटायझर, मास्क मोफत वाटप केले. रुग्णालय प्रशासनाला मदतीचा हातही दिला. त्यांच्यातील सामाजिक कार्याची तळमळ आणि कुशल संघटनात्मक नेतृत्व पाहूनच पक्षाने त्यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी आपल्या कार्यातून यशस्वीपणे पार पाडली आहे. आज शहराचा विचार करता युवकांची फळी भक्कमपणे बांधण्याबरोबरच महिलावर्गानाही त्यांनी एकत्रपणे आणले आहे. पक्षाचे कार्य आणि काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याबरोबरच राज्यातील सत्तेचा उपयोगही ते आज जनतेला करून देत आहेत शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

 नुसत्या योजना पोहोचविणे नव्हे तर त्या योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी ते नेहमीच धावपळ करतात. म्हणूनच आज  एक उभरते हरहुन्नरी नेतृत्व म्हणून आज अजय गोंदावळे यांच्याकडे पाहिले जात आहे. अशा युवा नेतृत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!!!