नागपूर : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर विक्रमी टोल वसुली झाली आहे. आतापर्यंत 21 कोटी रुपयांच्या घरात टोल वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर ते मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत नागपूर समृद्धी महामार्गावर महिन्याभरात 3 लाख 55 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. नागपूर ते शिर्डी या दरम्यानच्या 701 किलोमीटरच्या मार्गाचं 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. महाराष्ट्राचा गेम चेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत समृद्धी महामार्गावरून नागपूर- शिर्डी सुसाट विकास प्रवास सुरु आहे.समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना टोल द्यावा लागत आहे. नागपूर समृद्धी महामार्गावर महिन्याभरात 3 लाख 55 हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. या कालावधीत समृद्धी महामार्गावर 21 कोटी 3 लाख रुपये टोल स्वरुपात वाहनांवर आकारण्यात आल्याची माहिती आहे. तर महिन्याभरात 261 अपघाताच्या घटना घडल्या असून टायर फुटून किंवा नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाले आहे. नागपूर शिर्डी दरम्यानइंधन आणि वेळेची बचत होत असल्याने समृद्धी महामार्गावरील प्रवासाला पसंती देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.