ब्युरो चीफ : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी देशात किमान ४२ टन सोने खरेदी केली जाईल असे संकेत मिळत आहेत. यंदा सोने आयात कमी आहे तरी मागचा स्टॉक असल्याने बाजारात सोन्याची कमतरता नाही असेही समजते. सोने किंमती मध्ये चढउतार सुरु आहेत तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे भाव तीन हजारांनी वाढले आहेत. मात्र तरीही सोने विक्री वाढण्यामागे जागतिक मंदीचा धोका, डॉलर्स दरवाढ आणि जागतिक स्तरावर वाढलेले राजनीतिक तणाव ही कारणे सांगितली जात आहेत.
इंडियन बुलियन अँड ज्युवेलर्स असोसिएशनचे महासचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, गतवर्षी पेक्षा यंदा सोने दर अधिक आहेत तरी ४० ते ४२ टन सोने विक्री या एका दिवसात होईल असा अंदाज आहे. गतवर्षी ३० टन सोने विक्री झाली होती यंदा त्यात ३३ ते ४० टक्के वाढ अपेक्षित आहे. आजच्या दिवसात २ ते २.१० लाख कोटींचा सोने व्यवहार होऊ शकतो.
गेली दोन वर्षे करोना मुळे बाजारात ग्राहक नव्हते. २०२१ मध्ये ३० टन, २०२० मध्ये १५ टन, २०१९ मध्ये २८ टन तर २०१८ मध्ये २५ टन सोने विक्री झाली होती. लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे दागिन्यांना अधिक मागणी आहे. दक्षिण भारतात धनत्रयोदशीला नेहमीच सोन्याची अधिक मागणी असते पण यंदा उत्तर भारतातील सोने मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. पाउस चांगला झाल्याने ग्रामीण भागातून ग्राहकांची जास्त गर्दी होते आहे.