गोवा राज्यातील ६३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ९,७३६ जोडपी

सरकारी कर्मचारी सर्वेक्षणाच्या अहवालातून उघड : स्वायत्त संस्थांमध्ये १२८ कर्मचाऱ्यांमध्ये ४० जोडप्यांचा समावेश
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 04, 2022 12:31 PM
views 791  views

पणजी : सरकारने अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याचा आदेश जारी केल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचारी हाच एक चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता राज्य सरकारची वेगवेगळी खाती, महामंडळे, अनुदानित संस्था, स्वायत्त संस्थांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ९,७३६ म्हणजेच सुमारे ३१ टक्के कर्मचारी हे नवरा-बायकोच अर्थात जोडपी आहेत, अशी माहिती समोर आली आहे.       

सरकारी जावई शोधणाऱ्यांबाबत आणि सरकारी नोकर वर किंवा वधू म्हणून शोधणारे आपल्याला अवती भोवती दिसतात. मुलगा सरकारी नोकर असेल तर घरच्यांना सूनही सरकारी नोकरी करणारीच हवी असते. मुलगी सरकारी नोकरदार असेल तर जावईसुद्धा सरकारी नोकरच शोधतात. अशा नशिबवानांचा आकडा तसा कमी नाही. सर्वांत जास्त जोडपी सरकारी खाती आणि सरकारी अनुदानित संस्थांमध्ये आहेत. म्हणजे सुमारे ९,७३६ पुरुष जे सरकारी वेतन घेतात, त्यांच्या पत्नीही सरकारी कर्मचारी आहेत. अर्थात तेवढ्याच सरकारी वेतन घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे पतीही सरकारी वेतन घेणारेच आहेत.       

सरकारने केलेल्या सरकारी कर्मचारी सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ८७ सरकारी खात्यांमध्ये एकूण कर्मचारी आहेत ४३,३८३. त्यात ३०,१४७ पुरुष आणि १३,२३६ महिला आहेत. त्यात एकूण ६,८२० इतकी जोडपी आहेत.      

सरकारी अनुदानित संस्थांमध्ये ६,२४८ पुरुष आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे ९,६३६ महिला आहेत. त्या बहुतांशी शिक्षिका आहेत. या १५,८८४ कर्मचाऱ्यांमध्ये २,६६० जोडपी आहेत.       

महामंडळांमध्ये ३,७०६ कर्मचारी आहेत. त्यात ३,१६१ पुरुष व ५४५ महिला आहेत. पुरुषांचा आकडा जास्त आहे कारण कदंब महामंडळातील २,१४५ कर्मचारी आहेत, जे बहुतांश पुरुष आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये २१६ जोडपी आहेत. तसे पाहता स्वायत्त संस्थांमध्ये फक्त १८९ कर्मचारी आहेत. पैकी १२८ पुरुष आणि ६१ महिला आणि इतक्या कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल ४० जोडपी आहेत.       

नवरा किंवा बायको या पैकी एकटाच सरकारी सेवक असलेल्यांचा आकडा ५३,४२६ आहे. अनेक कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त सरकारी कर्मचारीही आहेत; पण अशा लोकांची किंवा कुटुंबांची माहिती सरकारकडे नाही.       

एकूण सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ३९,६८६ पुरुष कर्मचारी आहेत, तर २३,४७८ महिला कर्मचारी आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडे १५ खाती अशी आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. शिक्षण खाते त्यात आघाडीवर आहे. शिक्षण खात्यात २,४४३ तर सरकारी अनुदानित शाळांमध्ये एकूण ७,६६८ महिला कर्मचारी आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १,४६३ तसेच आरोग्य सेवा खात्यात १,९३२ महिला कर्मचारी आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात ८५९ तसेच पोलीस खात्यात ८७५ कर्मचाऱ्यांची नोंद आहे. अनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये ८७२ महिला कर्मचारी आहेत.      

पोलीस खात्यात सर्वाधिक पुरुष आहेत. हा आकडा सुमारे ७,२०१ एवढा आहे. त्यानंतर वीज खात्यात ५,८१९ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यात ३,०४९ पुरुष कर्मचारी आहेत. अनुदानित शाळांमध्ये ३,४८६ पुरुष तसेच अनुदानित उच्च शिक्षण संस्थांमध्ये ७६४ तसेच पालिकांमध्ये ८०७ पुरुष कर्मचारी आहेत. गोवा सदनमध्ये एकही महिला कर्मचारी नाही, तिथे सर्व पुरुष कर्मचारी आहेत.