औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २१ महाविद्यालयांच्या अतिरिक्त तुकड्या बंद करण्याची कारवाई केली आहे, अशी माहिती सोमवारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
विद्यापीठ प्रशासनाने नो ग्रेड दिलेल्या ५५ पैकी २१ महाविद्यालयांच्या तपासणीत भाैतिक सुविधा, प्राचार्य प्राध्यापक नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महाविद्यालयांची फक्त मुळ तुकडी सुरू ठेवून अतिरिक्त तुकड्या, पदव्युत्तर अभ्यासक्रम यंदा बंद करण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
सुनावणी लवकरच होणार
कुलगुरू येवले म्हणाले की, विद्यापीठाने दर्जा वाढवण्यासाठी शैक्षणिक मूल्यांकनाची मोहीम हाती घेतली आहे. विद्यापीठाशी संलग्नित ४८० पैकी ४०१ कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव आलेत. त्यापैकी आतापर्यंत २१८ कॉलेजचे मूल्यांकन पूर्ण झाले. त्या २१८ महाविद्यालयांचे संलग्नीकरण नूतनीकरणाचा पुरवणी ठराव विद्या परिषदेत मंजूर करण्यात आला. १९ महाविद्यालायांवर कुलगुरूंनी कारवाई केली असून, उर्वरित ४ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच होईल.
दोन महिन्यांची मुदत
कुलगुरू येवले म्हणाले की, संलग्नित ४०१ पैकी ज्या महाविद्यालयांना पाच वर्ष झालेले नाही, असे एकूण ५५ महाविद्यालये शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत. त्यांना तपासून संलग्नीकरण, नूतनीकरणासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. ५५ पैकी केवळ २१ महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर विद्यापीठ कायद्यानुसार निवडलेले प्राचार्य, प्राध्यापक नाहीत. तसेच नॅकही झालेले नसल्याने केवळ मूळ तुकडी यावर्षी सुरू ठेवावी. दोन महिन्यात प्राचार्य, प्राध्यापक नेमण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. अतिरिक्त आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तुकड्या बंद करण्यात आल्या आहेत.
अन्यथा संलग्नीकरण रद्द
कुलगुरू येवले म्हणाले की, निवृत्तीनंतर ६५ वयापर्यंतचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्राचार्य म्हणून नेमता येतील. मात्र, विद्यापीठाच्या कायद्यानुसार नेमणूक हवी. तरच परवानगी देवू. ३४ महाविद्यालयांनी वारंवार सांगूनही तपासणी करून घेतलेली नाही. समित्यांना बोलावले नाही. त्यांनी सात दिवसांच्या आत समित्यांना बोलून तपासणी करून घ्यावी. अन्यथा त्यांचे संलग्नीकरण रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.