रोजगार-स्वयंरोजगारासाठी सावंतवाडीत मॉडेल करियर सेंटरची करण्यात आली घोषणा

मॉडेल करियर सेंटरचे प्रमुख दयाळ कांगणे यांनी केली घोषणा | व्हरेनियम क्लाउड्सच्या सहकार्याने सिक्योर क्रेडेन्शियलचा उपक्रम
Edited by: भरत केसरकर
Published on: January 05, 2023 17:50 PM
views 238  views

सावंतवाडी : सावंतवाडीत लवकरच सिक्योर क्रेडेन्शियलच्या वतीने मॉडेल करियर सेंटर सुरु होणार आहे, अशी घोषणा या मॉडेल करियर सेंटरचे प्रमुख दयाळ कांगणे यांनी केली. हे मॉडेल करियर सेंटर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना महत्वाचे ठरणार असल्याचेही श्री. कांगडे यांनी सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्याचे काम या मॉडेल करियर सेंटरद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी या सिक्योर क्रेडेन्शियलच्या मॉडेल करियर सेंटर मध्ये प्रवेश घ्यावा आणि अप्लाय करियरची दिशा ठरवावी असे आवाहन दयाळ कांगडे यांनी केले आहे. 

     या मॉडेल करियर सेंटरबाबत महिती देताना दयाळ कांगडे म्हणाले कि, व्हरेनियम क्लाउड कंपनीच्या सहकार्याने सिक्योर क्रेडेन्शियल हे मॉडेल करियर सेंटर उभारत आहे. या सेंटरमधून करियर समुपदेशन पासून रोजगार निर्मिती आणि रोजगाराची उपलब्धता याबाबत माहिती मिळेल. या सेंटरमधून महाराष्ट्रासह, गोवा, गुजरात आणि संपूर्ण भारतात असणाऱ्या नोकरीच्या संधींबाबत माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्यांची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन विद्यार्थ्यांना आय टी रोजगार आणि स्वयंरोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण केंद्र देखील सुरु करण्यात येत आहे. 

    श्री. कांगडे पुढे म्हणाले, मॉडेल करियर सेंटर हि संकल्पना केंद्र शासनाने पूर्ण भारतासाठी राबविली आहे. आतापर्यंत सुमारे २८ मॉडेल करियर सेंटर केंद्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहेत. व्हरेनियम क्लाउड्सच्या सहकार्याने सिक्योर क्रेडेन्शियल्सने हि संकल्पना सावंतवाडीमध्ये राबवायचे ठरविले आहे. या मॉडेल करियर सेन्टर्सचा लवकरच महाराष्ट्रभर शाखा विस्तार केला जाईल असे देखील दयाळ कांगणे यांनी सांगितले. 

    राज्यातील सर्व एमआयडीसीत असलेल्या सर्व कंपन्यां मॉडेल करियर सेंटर्सही जोडलेल्या आहेत हे या मॉडेल करियर सेंटरचे वैशिट्य आहे. या कंपन्यात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी आणि त्याची माहिती या मॉडेल करियर सेंटरमध्ये जमा होत असते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून त्यांचे समुपदेशन  करून  त्यांना रोजगाराबाबत मार्गदर्शन करणे यामुळे शक्य होणार आहे.  सावंतवाडीत सुरु होत असलेल्या या मॉडेल करियर सेंटरशी पुणे, कोल्हापुर, गोवा, मुंबई येथील एमआयडीसीतील कंपन्या जोडल्या गेलेल्या असल्याने विद्यार्थ्यांना येथील रोजगार उपलब्ध होऊ शकतात.  

    व्हारेनियम क्लाउड कंपनी हि आयटी क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी आहे. आज पूर्ण जग आयटीवर आधारित आहे. व्हरेनियम कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना संपूर्ण जगभरातली माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर अतिशय उत्तमोत्तम रोजगार या माध्यमातून मिळवून  देण्याचा प्रयत्न केला जाणार असून आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्र देखील येथे सुरु करून आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना कशा उपलब्ध होतील याकडे सुद्धा हे मॉडेल करियर सेंटर प्रयत्न करेल असे श्री. कांगणे यांनी सांगितले. त्यामुळे जास्तीजास्त विद्यार्थ्यांनी या सिक्योर क्रेडेन्शियलच्या मॉडेल करियर सेंटर मध्ये प्रवेश घ्यावा आणि त्याच्या करियरची दिशा ठरवावी असे आवाहन दयाळ कांगणे यांनी केले आहे.