राजस्थानमध्ये उच्चवर्णीय शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायल्याच्या कारणावरून ९ वर्षीय इंद्रकुमार या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केले असून आरोपींविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, शिक्षकाने मारहाण केल्यानंतर या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मोठे कष्ट घेतल्याचे समोर आले आहे. त्यांनी २५ दिवसांत ८ रुग्णालयं गाठली तसेच आपल्या मुलाचा जीव वाचावा म्हणून त्यांनी या काळात तब्बल १३०० किमी प्रवास केला आहे.
राजस्थानमधील जालोर येथील सामाजिक न्याय विभागाचे सहायक संचालक सुभाषचंद्र मणी यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये या मुलासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे. याच अहवालामध्ये ९ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी काय-काय प्रयत्न करण्यात आले, याचीही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार इंद्रकुमार मेघवाल याला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी २० जुलै रोजी घर सोडले होते. याच दिवशी इंद्रकुमार शाळेत गेला होता. मात्र पाणी पिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर त्याच्या कानातून रक्त निघत होते. त्यानंतर इंद्रकुमारला त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले होते.
मात्र एक दोन दिवसानंतर पुन्हा त्रास सुरू झाल्यानंतर इंद्रकुमारला त्याच्या कुटुंबीयांनी सुराणा गावापासून ५० किमी अंतरावर असलेल्या भीनमाळ येथील आस्था मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारानंतर त्याला परत घरी आणण्यात आले. मात्र त्रास होत असल्यामुळे त्याला परत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला गुजरातमधील दीसा येथील एका रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. हे रुग्णालय साधारण १५५ किलोमीटर अंतरावर होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंदकुमारच्या कुटुंबीयांनी त्याला दीसा येथील करणी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारानंतर त्याला २४ तासांनी डिस्चार्ज देण्यात आला.
इंद्रकुमारला घरी आणल्यानंतर परत त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला भीमनाळ येथील त्रिवेणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्याला तीन दिवस ठेवण्यात आले. मात्र या ठिकाणी त्याची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्याला गुजरातमधील मेहसाणा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले. हे रुग्णालय भीनमाळपासून ३०० किमीच्या अंतरावर आहे. या रुग्णालयातही इंद्रकुमारची प्रकृती न सुधारल्यामुळे त्याला येथून २७० किमीवर असलेल्या उदयपूरमधील गितांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंद्रकुमारला अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र या रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, इंद्रकुमारच्या या मृत्यूनंतर राजस्थान सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. येथील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर दुसरीकडे या घटनेची सरकारने दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गेहलो सरकारने दिले आहे. इंद्रकुमारचा मृत्यू क्रोनिक सप्युरेटिव्ह ओटिटिस मीडिया (CSOM) चा त्रास होत होता. तसेच बुबळं आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.