सावंतवाडी : राजकारणात अनेक नेते असे आहेत ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी अर्पण केलयं. देशात महाराष्ट्राच प्रतिनिधित्व करणारे खा.शरद पवार यांच वय ८२ वर्ष असून नुकतंच त्यांनी ८३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. तर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे देखील ऐंशी क्रॉस आहेत. त्यांचा राजकारणातील सक्रीय सहभाग, कामाची पद्धत तिशीतल्या नेत्याला लाजवेल अशीच आहे. राज्याच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे देता येतील. सावंतवाडी तालुक्यात देखील असं एक व्यक्तीमत्व आहे ते म्हणजे ओटवणे ग्रामपंचायतच्या निवडणूकीच्या मैदानात उतरलेले ८० वर्षांचे दाजी. गाव विकास पॅनलचे थेट सरपंच पदाचे ते उमेदवार आहेत. वयाच्या ऐंशीनंतर देखील गावच्या विकासाठी त्यांची धडपड, राजकारणात सक्रिय सहभाग आजच्या तरुणांना देखील लाजवेल असाच आहे. त्यांच्या विरोधात युवा तरूण तडफदार गाव उत्कर्ष पॅनलचे उमेश गांवकर निवडणूक रिंगणात आहेत. ओटवणेत गांवकर विरूद्ध गांवकर अशी थेट लढत होत असून आज मतदार राजानं आपला कौल मतपेटीत कैद केलाय. त्यामुळे ओटवणेतील मतदार राजा ऐंशी वर्षांच्या दाजींना संधी देणार की तरुण तडफदार उमेश गांवकरना देणार हे २० डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.