कोकणातील जाखडी - भजन कलेला राजाश्रय

कदम कुटुंबाची बांधिलकी
Edited by: मनोज पवार
Published on: September 08, 2024 09:19 AM
views 457  views

खेड : कोकणातील लोककला म्हणजे जाखडी नृत्य. या लोककलेला सरकारी पातळीवर राजाश्रय मिळावा यासाठी शिवसेना नेते रामदास कदम व कुटुंबीय हे त्यांच्या खेड तालुक्यातील जामगे गावातील घरी सलग गेल्या तीस वर्षांपासून आदर्श उपक्रम राबवत आहेत. गणेशोत्सवात शेकडो मंडळांना कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ ते उपलब्ध करून देत असून त्या सोबतच या कलाकारांना प्रोत्साहन म्हणून विविध प्रकारचे साहित्य देखील कदम देत असतात. यावर्षी देखील आज पासून हा उपक्रम गणेशोत्सवात सुरू झाला आहे.

कोकणातील जाखडी, भजन मंडळे, दशावतार मंडळ, शक्ती - तुरा कलाकार शाहिर ही येथील संस्कृतीची ओळख आहेत. या कलाकारांना राज्य व केंद्र सरकारने देखील काही अंशी कागदोपत्री मान्यता दिली आहे. मात्र या कलाकारांना तुटपुंजे मानधन मिळते व वृध्द झाल्यावर अतिशय हलाखीचे जीवन जगावे लागते. कोकणातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी मात्र आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करताना या कलाकारांच्या केलेला दाद मिळवून देण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या तीस वर्षापासून अविरत सुरू ठेवला आहे.

खेड तालुक्यातील जामगें हे शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे गाव. दरवर्षी संपूर्ण कदम कुटुंब या गावातील त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येत असते. या उत्सवातून कोकणातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळावी व पारंपरिक कला जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष नियोजन रामदास कदम व कुटुंबीय करत असतात. गेल्या तीस वर्षात लाखो कोकणी कलाकार कदम यांच्या निवासस्थानी आपली कला सादर करून पाठीवर शाबासकीची थाप मिळवून गेले आहेत. या ठिकाणी येणारी जाखडी शक्ती - तुरा मंडळे, भजन मंडळे यांना झांज, ढोलकी, पेटी व रोख मानधन देण्याची गेल्या तीस वर्षांची परंपरा यावर्षी देखील सुरू आहे. आगामी गणेशोत्सवाचे पाच दिवस येथे हजारो कलाकार दाखल होऊन आपली कला सादर करणार आहेत.

कोकणातील कला व कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न : आ.योगेश कदम


कोकणातील कला व कलाकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझे वडिलांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या कार्यकाळात आमच्या घरी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. तोच वारसा आम्ही आजवर जपत आहोत. जाखडी नृत्य, भजन, दशावतार या कोकणातील कला जपणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. दरवर्षी सुमारे चारशे ते साडे चारशे मंडळातून हजारो कलाकार आमच्या बाप्पा समोर कला सादर करतात, अशी माहिती दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी  दिली.