
वैभववाडी : तळेरे -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवरून उपअभियंत्याच्या निषेधाचे बँनर लागले आहेत. शहरासह रेल्वे फाटक व करुळ घाटात हे बँनर लागले आहेत. उपअभियंता अतुल शिवनीवार यांच्या नावाचा यावर उल्लेख आहे.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक बनले. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे कोकणातील ऊस तोड रखडली आहे. व्यापारी वर्गाचा घाटमाथ्यावरुन येणारा मालाला विलंब होत आहे. गेली दोन वर्षे या मार्गाची दुरावस्था झाली आहे. संबंधित विभाग याबाबत गांभीर्याने नसल्याचे दिसत आहे.
अखेर याचा संताप म्हणून अधिका-यांचा निषेध करणारे बँनरच झळाळले आहेत. या मार्गावर उपअभियंत्याच्या फोटो व दुरध्वनी नंबरसह बँनर लावले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अतुल शिवनीवार यांचा जाहीर निषेध. पर्यटकांनो करा,शेतकऱ्यांनो करा,व्यावसायिकांनो करा जाहीर निषेध असा मजकूर बँनरवर लिहिला आहे. तसेच त्याखाली त्यांचा दुरध्वनी क्रमांक देखील टाकला आहे. या बँनरबाजीची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.