युवकांच्या आत्महत्यांना प्रसिद्धी नव्हे, समुपदेशनाची गरज !

दयानंद कुबल यांचे भावनिक आवाहन
Edited by:
Published on: April 11, 2026 16:04 PM
views 35  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात वाढत्या युवकांच्या आत्महत्यांच्या घटनांबाबत प्रसारमाध्यमांनी अनावश्यक प्रसिद्धी देण्याऐवजी समाजाने जबाबदारीची भूमिका घ्यावी, असे अत्यंत भावनिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी केले आहे.

अशा संवेदनशील घटनांचे वारंवार व ठळक वृत्तांकन केल्याने काही युवकांमध्ये नकारात्मक विचारांना चालना मिळू शकते. त्यामुळे अशा बातम्यांचे सनसनाटीकरण टाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सततच्या प्रसिद्धीमुळे काही मानसिकदृष्ट्या अस्थिर युवकांवर विपरीत परिणाम होऊन तेही टोकाच्या निर्णयांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे माध्यमांनी केवळ बातमी म्हणून न पाहता समाजहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. आत्महत्यांच्या घटनांचे अतिरंजित, तपशीलवार किंवा वारंवार प्रसारण टाळल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांऐवजी संकटांवर मात केलेल्या प्रेरणादायी कथा, समुपदेशन सेवा आणि मदत केंद्रांची माहिती यांना प्रसिद्धी देणे अधिक उपयुक्त ठरते. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, संवाद वाढवणे आणि योग्य वेळी मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

समाजातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलता जपून अशा विषयांकडे पाहणे गरजेचे आहे. माध्यमांनी जबाबदारीने व संतुलित वृत्तांकन केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाऊन युवकांना योग्य दिशा मिळू शकते.