
- सिंधुदुर्गात आधार किटचे वाटप
कुडाळ : राज्यातील शून्य ते सात वर्षे वयोगटातील सुमारे १२ ते १४ टक्के बालके अद्याप आधारकार्डपासून वंचित आहेत. या बालकांसाठी आधार केंद्रांच्या माध्यमातून 'ऑनलाईन घरपोच आधारकार्ड' देण्याची सुविधा शासन लवकरच कार्यान्वित करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सांस्कृतिक कार्य व माहिती-तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
येथील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित 'आधार किट वाटप' आणि 'आपले सरकार सेवा केंद्र' चालकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा आधार केंद्रांना नवीन किटचे वाटप करण्यात आले.
आधारकार्ड हे नागरिकांच्या अधिकारांचे आणि ओळखीचे प्रमुख साधन बनले आहे. हे स्पष्ट करताना मंत्री शेलार यांनी केंद्र चालकांना सतर्कतेचा इशारा दिला. "बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड बनविण्याचे प्रकार घडू शकतात, हा धोका ओळखून सर्व चालकांनी अत्यंत सजग राहून काम करावे," असे आवाहन त्यांनी केले.
शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना मंत्री म्हणाले की:
प्रलंबित किटचे वाटप: अनेक जिल्ह्यांत आधार किट जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्या केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः दौऱ्यादरम्यान वाटप करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३८ किट मंजूर असून त्यातील ६ किटचे वाटप आज करण्यात आले.
महत्त्वाचे करार: नागरिकांना ऑनलाईन सुविधा देण्यासाठी 'मेटा' कंपनीशी करार करण्यात आला आहे.
दरपत्रकात सुधारणा: सेवा शुल्कात २० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असून लोकसंख्येनुसार केंद्रांची संख्या निश्चित केली जात आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 'सुशासन' देण्याचे आश्वासन दिले आहे. हे सुशासन तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्र चालकांची आहे. तुमचे काम 'उत्कृष्ट' कडून 'अतिउत्कृष्ट' कडे नेण्याचा प्रयत्न करा."
— ॲड. आशिष शेलार
या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आमदार निलेश राणे यांनीही केंद्र चालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बीडीओ प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.










