कळसुलकर स्कूलच्या 'डिजिटल कक्षा'चे १३ एप्रिलला भव्य उद्घाटन

कै. अल्ताफ खान यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कुटुंबीयांच्यावतीने भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2026 17:14 PM
views 16  views

सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी १३ एप्रिल रोजी एक आगळावेगळा सोहळा संपन्न होणार आहे. शाळेचे अत्यंत लाडके आणि आदर्श शिक्षक कै. अल्ताफ खान सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने शाळेला भेट देण्यात आलेल्या 'डिजिटल कक्षा'चे भव्य उद्घाटन सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

अल्ताफ खान सरांनी आपल्या अध्यापन काळात हजारो विद्यार्थी घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध पण प्रेमळ स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. हिंदी विषयावरील त्यांचे प्रभुत्व आणि वाचनाची आवड यामुळे त्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शाळेतील नवीन पिढीला आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली व्हावीत, या उदात्त हेतूने खान परिवाराने हा डिजिटल कक्ष उभारला आहे.  उद्घाटन सोहळ्याला शाळेचे माजी विद्यार्थी, आजी-माजी गुरुवर्य, शालेय समितीचे संचालक तसेच चेअरमन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आपल्या लाडक्या सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक माजी विद्यार्थी या प्रसंगी एकत्र येणार आहेत.

या उपक्रमाबद्दल बोलताना माजी विद्यार्थी राजू मसुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,अल्ताफ खान सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. समाजसेवेची आवड आणि शिस्त आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली. ईश्वराने त्यांना आमच्यापासून लवकर हिरावून घेतले ही वेदना मोठी आहे, पण या डिजिटल कक्षाच्या माध्यमातून त्यांचा आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहील. भविष्यातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे, हीच आमची अपेक्षा आहे. कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या या डिजिटल उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सोमवारी होणाऱ्या या सोहळ्याला सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.