
देवगड : देवगड येथील केळकर महाविद्यालयात शिकत असलेल्या साईल किशोर पवार (१८, रा. तोरसोळे गावकरवाडी) याने घराच्या टेरेसवरील लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १ डिसेंबर रोजी रात्री १० वा.सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
साईल हा तोरसोळे गावकरवाडी येथे राहत होता. देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयात तो एफ. वाय. बी.कॉम. इयत्तेत शिकत होता. तो राहत असलेल्या घराच्या एका भागात अरविंद रामचंद्र पवार त्यांची पत्नी व मुलगी राहत असून दुसऱ्या भागात साईल,त्याची आई कामीनी किशोर पवार व चुलती वनमाला पवार अशी तिघेजण एकत्रित कुटुंबात राहत होती. साईल याची मोठी बहीण प्रतिमा ही विवाहित असून कोल्हापूर येथे राहते तर भाऊ कार्तिक हा कामानिमित्त मुंबईत राहतो.
१ डिसेंबर रोजी अरविंद पवार हे घरात रात्री १० वा. सुमारास जेवण आटोपून बसलेले असताना त्यांना दुसऱ्या भागात राहणाऱ्या कामिनी पवार यांच्या घराच्या टेरेसवरून जोरजोरात रडण्या-ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ टेरेसवर जाऊन पाहिले असता साईल हा टेरेसच्या लोखंडी बाराला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेला स्थितीत दिसला.
घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबतची खबर अरविंद पवार यांनी दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.