युवावर्गाने चांगल्या सवयी जोपासाव्यात : पोलीस उपनिरीक्षक बापू खरात

फोंडाघाट महाविद्यालयात ड्रग्ज विरोधी जनजागृती
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2024 13:43 PM
views 124  views

कणकवली : आज समाजामध्ये व्यसनाधीनता भयानक रूप धारण करत आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट यापासून ते अफू, गांजा, भांग, चरस, मॉर्फिन, हेरॉइन, कोकेन, ब्राऊन शुगर असे अनेक अमली पदार्थ युवकांचे जीवन नष्ट करत आहेत. एकीकडे अतिश्रीमंतीमुळे मौजमजा, चैन करण्यासाठी समाजातील अनेक स्त्रिया, पुरुष, मुले, मुली या व्यसनाधीनतेचे बळी पडतात.विद्यार्थ्यांनी चांगले छंद जोडा, वाईट व्यसने सोडावीत असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी केले.



फोंडाघाट कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये एनएसएस, एनसीसी व डीएलएलइ विभागांच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनच्या सहकार्याने ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग युवा जनजागृती अभियान राबवण्यात आले. कणकवली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी युवा वर्गास मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस हवालदार उत्तम वंजारे आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बापू खरात म्हणाले, अतिदारिद्र्यातील लोकही आपल्या चिंता, तणाव यापासून सुटका करण्यासाठी म्हणून व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. आजच्या युवकांसमोर आ वासून उभी टाकलेली बेकारी त्यांना व्यसनाधीनतेकडे ढकलते. तर नुकतेच तारुण्यात पदार्पण करणारे युवक युवती एक आकर्षण, नाविन्य, नवलाई म्हणून व्यसनाकडे वळतात. त्यांची सुरुवात एक घोट, एक पेला, एक बाटली अशी वाढतच जाते. जशी व्यसनाधीनता वाढत जाते, आणि तिचा शेवट संसाराची राखरांगोळी करूनच होतो. विविध व्यसनांसाठी पैसा कमी पडायला लागला की मग किरकोळ चोऱ्या, दरोडे, खून, मारामाऱ्या सुरू होतात व त्यातून मिळवलेला पैसा पुन्हा व्यसन आणखीनच घट्ट करण्यासाठी वापरला जातो. पूर्वी शहरापुरते मर्यादित असलेले अमली पदार्थांचे व्यसन आता खेड्यापाड्यात पोहोचले आहे. त्यामुळेच आता पोलीस स्टेशनमध्ये विवाहित महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. कुटुंबातील पुरुषांकडून मारहाण, घरातील कौटुंबिक वस्तूंची परस्पर विक्री, अशा घटना वाढत आहेत. व्यसनांना एक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे आणि व्यसनाकडे आधुनिक फॅशन म्हणून पाहिले जात आहे. प्रसंग आनंदाचा असो की दुःखाचा, व्यसनांना जवळ केले जात आहे. जवळच्या मित्रांचा आग्रह किंवा वरिष्ठांचा आदेश म्हणून लोक व्यसनाचे बळी ठरत आहेत.


खरे तर व्यसनाधीनता म्हणजे मृत्यूलाच कवटाळणे आणि तसा वैधानिक इशाराही त्याच्या पॅकिंगवर लिहिलेला असतो. तंबाखूमुळे कॅन्सरला आमंत्रण मिळते तर मद्यपानामुळे अनेक शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम होत असतात. विविध प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होते. एकंदरीत व्यसनामुळे व्यक्तीचे, समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे नुकसान होत असते.सिंधुदुर्ग पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. खरे तर देशाचे भवितव्य हेच युवकांच्या खांद्यावर विराजमान असते. विद्यार्थ्यांनी गायन, वाचन, वाद्यवादन, लेखन, अभिनय, वक्तृत्व अशा चांगल्या सवयी लावून घ्याव्यात व त्यामधून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही होतो. तसेच कुठेही शंकास्पद हालचाली आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन बापू खरात यांनी केले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, पोलीस विभागाकडून दिलेली ही माहिती अतिशय मौलिक आहे. व्यसनामुळे मानवाची अधोगती होते म्हणून या व्यसनांना बदनाम केलं पाहिजे. या व्यसनांना वेळीच वेसन घातली पाहिजे, तरच मानवाची प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याची जोपासना करावी, कौटुंबिक नाती सांभाळावीत व आपले आयुष्य सुखा समाधानाने जगावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राज ताडेराव यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभारप्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी मानले.