
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अणाव गावाने आज एक वेगळाच उत्साह अनुभवला. निमित्त होते 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत' आयोजित ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रमाचे. या सोहळ्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांशी संवाद साधला. अणाव येथील श्री देव स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात हा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी ग्रामस्थांना या अभियानात जिल्ह्याचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर यांनी आपल्या शैलीत ग्रामस्थांचे मनोरंजन करत, गावच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे महत्त्व पटवून दिले.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण
केवळ औपचारिकता न पाळता, या कार्यक्रमात अणाव ग्रामपंचायतीच्या भविष्यातील दृष्टीकोनातून महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला: पेशंट बँक: गरजू रुग्णांच्या मदतीसाठी 'पेशंट बँक'चे लोकार्पण.
डिजिटल ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन. पर्यावरण रक्षण: प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्यांचे अनावरण.
या सोहळ्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच आदिती अणावकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच लिलाधर अणावकर यांनी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. अणाव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे.










