
कुडाळ : "तुम्हाला घडविणाऱ्या गुरुजनांच्या कष्टाला आणि मार्गदर्शनाला आपल्या प्रयत्नांची जोड द्या, तरच तुमचे टॅलेंट जगासमोर येईल. मराठी माणसाने स्वतःमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन ते जोपासले पाहिजेत. ज्या मराठी माणसांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यांना मराठी माणसानेच खंबीर साथ देणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी केले. कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. आपल्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जागा (लोकेशन) पाहण्यासाठी श्रोत्री सिंधुदुर्गात आले असताना त्यांनी या संस्थेला भेट दिली.
मराठी भाषेचे वैभव जपा
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुष्कर श्रोत्री यांनी मराठी भाषेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, "संस्काराचे बाळकडू पाजणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करा आणि तिचे भाषा वैभव जपा. दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त वापर करा, मराठीत लिहा आणि व्यक्त व्हा. मराठी अस्मिता सातासमुद्रापार नेण्यासाठी वाचन करून स्वतःला घडवा. नवनवीन निर्मिती करा, जेणेकरून जगाला तुमच्या कर्तृत्वाची ओळख होईल." बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना दिग्गज कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देते, हे विद्यार्थ्यांचे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेच्या वतीने पुष्कर श्रोत्री व त्यांच्या टीमचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्रोत्री यांच्या हस्ते संस्थेतील कलाकार विद्यार्थ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी आर्ट डिरेक्टर सुमित पाटील, कॅमेरामन आशिष वैद्य, पटकथा लेखक चैतन्य राणे, असोसिएट डायरेक्टर विशाल पोळ, प्रोडक्शन मॅनेजर सौरभ झुंजार, तसेच संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, प्राचार्य अरुण मर्गज, कल्पना भंडारी, वैशाली बांदेकर, पल्लवी कामत आणि प्रा. वैशाली ओटवणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.










