'चला कुडाळ घडवूया'

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून कोकणातील तरुणाईला मिळणार नवी दिशा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 17, 2026 17:57 PM
views 44  views

कुडाळ : कोकणातील विद्यार्थ्यांची हुशारी आणि कष्ट करण्याची तयारी यांना योग्य मार्गदर्शनाची जोड मिळावी, या उद्देशाने 'चला कुडाळ घडवूया' उपक्रमांतर्गत कुडाळ येथे भव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मंदार शिरसाठ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून निवृत्त जीएसटी डेप्युटी कमिशनर गणेश दळवी उपस्थित होते. त्यांनी एमपीएससी (MPSC) आणि यूपीएससी (UPSC) परीक्षांची तयारी कशी करावी, विषयानुसार गुणांचे नियोजन आणि प्रत्यक्ष मुलाखतीला (Interview) सामोरे जाताना कोणती खबरदारी घ्यावी, यावर स्वतःच्या अनुभवातून सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंग जाधव यांनी स्पर्धा परीक्षा देताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात कशी करावी, याचे वास्तववादी चित्रण मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचीही माहिती दिली. सी.ए. सौदागर यांनी बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि त्यातील परीक्षांच्या तयारीबाबत मोलाच्या टिप्स दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजक मंदार शिरसाट यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. कोकणातील मुलांच्या बुद्धिमत्तेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. लायन्स क्लब कुडाळचे अध्यक्ष आनंद कर्पे यांनी आगामी काळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवणार असल्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास सुमारे २०० विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यासपीठावर संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुरवसे, लायन्स क्लबचे मनोज वालावलकर, जीवन बांदेकर, स्नेहांकिता माने, डॉ. चुबे, सी.ए. सागर तेली, कोरगावकर, सौ . चुबे, श्रीनिवास नाईक, मंजुनाथ फडके, लोखंडे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यापुढेही अशाच प्रकारे विद्यार्थी उपयोगी आणि शैक्षणिक उत्थानाचे कार्यक्रम राबविले जातील, अशी माहिती मंदार शिरसाट यांनी यावेळी दिली.