
कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना 'एक्वागार्ड वॉटर प्युरिफायर' भेट देण्यात आले.
अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून हे प्युरिफायर उपलब्ध करून देण्यात आले. केवळ पाणीच नव्हे, तर वाढदिवसाचे निमित्त साधून चिमुरड्यांना शालेय साहित्य आणि खाऊचेही वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या विशेष कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षांसोबतच शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका अक्षता खटावकर, आफरीन करोल, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, नयना मांजरेकर आणि चांदणी कांबळी उपस्थित होत्या.
तसेच शिवसेना हो चालेल चालेलउपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उपशहर प्रमुख चेतन पडते, राजू गवंडे, प्रथमेश केळबाईकर, साक्षी सावंत, रेवती राणे, रेखा काणेकर, बाळा कुडाळकर, अजित गावडे, वरू राणे, लवू कदम यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने दिखाऊ खर्च टाळून अंगणवाड्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्याबद्दल अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. कुडाळच्या नगराध्यक्षांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक होत आहे.










