चढणीचे मासे धरण्यासाठी युवक अॅक्टीव्ह

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:50 AM
views 94  views

सावंतवाडी : दडी मारून बसलेल्या मान्सूनच्या दमदार आगमनाने शेतकरी राजा सुखावला आहे. उन्हाळ्यात गर्मीने लाहीलाही झालेल्या नागरिकांना पावसाच्या थंडाव्याने दिलासा मिळाला आहे. तर बेडुकांच्या आवाजाने परिसरातील वातावरण दुमदुमून गेले आहे.

चढणीचे मासे धरण्यासाठी युवक वर्ग मोठ्या प्रमाणात नदी, ओढे व शेळजमिनीच्या ठिकाणी पहायला मिळत आहेत. मिळेल त्या साहित्याने मासे पकडण्यासाठी सगळे व्यस्त आहेत.पहिल्या पावसात शेळीत मिळणाऱ्या खेकड्यांचा रस्सा कोकणात अत्यंत आवडीने खाल्ला जातो. तसेच चढणीच्या माशांच्या कढीची चव काही औरच असते. खवळे, काडी, मरल, चिंगुळ, डेमके व ठिगुर यासारखे मासे पहिल्या पावसात शेतात चढतात. त्यांना पकडण्यासाठी खून (मासे पकडण्याची वस्तू), शेंडी, कांडाळी व काठीचा यांचा वापर केला जातो. बाजारपेठेतही या माशांना मोठी मागणी असते. अगदी चढ्या दराने हे मासे खरेदी करण्यात येतात.

काही ठिकाणी पेरण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरु केली आहेत. पारंपरिक बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने भातशेती केली जात आहे.