तुमची कामे मार्गी लागतील | माजी सैनिकांना तहसीलदारांचं आश्वासन..!

Edited by: भरत केसरकर
Published on: August 25, 2023 19:27 PM
views 106  views

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाच्यावतीने सेवेत कार्यरत असलेले सैनिक आणि माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी अमृत जवान अभियानांतर्गत तहसील कार्यालय येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये सैनिकांनी अनेक व्यथा, समस्या मांडल्या आम्ही देशासाठी सेवा केली मात्र सेवानिवृत्त झाल्यावर प्रशासनाकडून जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही अशी खंत व्यक्त केली यावेळी तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले की, तुम्ही कधी या तुमची कामे सांगा की मार्गी लावली जातील आणि तुमचा सन्मान ठेवला जाईल.

अमृत जवान अभियानांतर्गत कुडाळ तहसील कार्यालय येथे कार्यरत असणारे सैनिक आणि माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू, पोलीस अंमलदार संजय कदम, कृषी अधिकारी घाटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर सावंत, बाळकृष्ण चव्हाण, पद्मनाभ परब, सुभाष शिर्के, श्री. ताम्हाणेकर आदी मोठ्या संख्येने सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अनेक माजी सैनिकांनी तलाठी देत असलेल्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. आम्ही देश सेवेसाठी असताना या ठिकाणच्या सातबारा मध्ये झालेले बदल ते रद्द करण्यासाठी आम्हाला हेलपाटे मारावे लागत आहेत अशा अनेक गोष्टी आहेत माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारे शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून सन्मान दिला जात नाही ही खेदाची गोष्ट आहे असे सांगून आमची जी कामे आहेत ती मार्गी लावावी असे सेवानिवृत्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर सावंत यांनी सांगितले.

तर तहसीलदार अमोल पाठक यांनी सांगितले की सैनिक आमच्या देशाचा सन्मान आहे पण ज्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे वागणूक दिली जाते ते चुकीचा आहे यापुढे तुम्ही तुमच्या कोणत्याही कामानिमित्त माझ्याकडे या ते काम मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन तुमचा सन्मान हा राखला गेला पाहिजे असे सांगितले.