
चिपळूण : शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारून एका तरुण विवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (३० जुलै) दुपारी घडली. सदर घटनेमुळे चिपळूण परिसरात एकच खळबळ उडाली असून एनडीआरएफच्या जवानांकडून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अधिक माहितीनुसार, अश्विनी निलेश आहिरे (वय १९) व तिचा पती निलेश रामदास आहिरे (वय २६), सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी असून, मूळ गाव धुळे जिल्ह्यात आहे. आज दुपारी दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गंधारेश्वर ब्रिजवरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक व वैयक्तिक कारणामुळे हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संदर्भात तपास सुरू असून निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तत्काळ एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) यांना पाचारण करण्यात आले असून त्यांचे जवान दोघांचा मृतदेह शोधण्यासाठी नदीत कसोशीने शोध घेत आहेत. गांधारेश्वर पुलावर या दांपत्याची दुचाकी आढळून आली आहे.
या घटनेमुळे गंधारेश्वर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोध कार्यासाठी नदीकाठ सील केला. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
दरम्यान, अश्विनी व निलेश यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजते. दोघेही काही दिवसांपासून पाग येथे भाड्याने वास्तव्यास होते. आत्महत्येपूर्वी काही प्रकार झाला होता का, कोणी तरी जबाबदार आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
या घटनेची माहिती संबंधित प्रशासन व महसूल विभागाला देण्यात आली असून, अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण आणि पाश्र्वभूमी काय होती याचा तपास पुढील काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी प्रशासनाचा तातडीचा प्रतिसाद आणि एनडीआरएफचे शोधकार्य सुरू असले तरी दोघांनाही वाचवता न आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.