ब्लड बँकेतील पदभरती न झाल्यानं युवा रक्तदाते आक्रमक

आत्मदहनाचा दिला इशारा
Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 15:13 PM
views 69  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी ही केवळ दोन जणांच्या जीवावर सूरु आहे. पदभरती करणं आवश्यक असताना केवळ दोघांच्या जीवावर ही ब्लड बँक चालू आहे. वारंवार निवेदने देऊन इशारे देऊन देखील पदभरती केली जात नाही आहे. गेले ६ महिने लक्ष वेधून, पत्रव्यवहार करून प्रशासन दखल घेत नाही आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पद न भरल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. सोमवारी काळी फीत बांधून रक्तदात्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर आरोग्य प्रशासनाचा निषेध नोंदवला.


यावेळी देव्या सुर्याजी म्हणाले, सावंतवाडीची ब्लड बँक बंद करण्याचा घाट प्रशासन आखत आहे. सोमवार पर्यंतची मुदत देऊन देखील कोणतीही हालचाल प्रशासनाऩ केली नाही.  त्यामुळे आज जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत‌. सावंतवाडी रक्तपेढीत एक तरी अधिकचा टेक्निशियनची भरती न  झाल्यास तालुक्यातील रक्तदात्यांसह  जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करू असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला. तर गरजेच्या वेळी आम्ही रक्तदाते सामाजिक बांधिलकी जपत पुढे येतो. पण, जोवर पदभरती होत नाही तोवर आम्हाला देखील रक्तदान करताना विचार करावा लागेल अन् याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा आरोग्य प्रशासन राहिलं असं मत व्यक्त केले‌.


युवा रक्तदाता संघटनेन सोमवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर काळी फीत बांधून वैद्यकीय प्रशासनाचा व शल्य चिकित्सकांचा त्यांनी निषेध करत आंदोलन छेडलं. यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, संदीप निवळे, राजू धारपवार, सुरज मठकर, प्रतिक बांदेकर, रवी जाधव, वसंत सावंत, प्रथमेश प्रभु, दीपक धुरी, देवेश पडते आदी उपस्थित होते.