पहिल्या टर्ममध्ये आमदार म्हणून योगेश कदम यांचे कार्य प्रभावी : खासदार सुनील तटकरे

Edited by: मनोज पवार
Published on: October 27, 2024 14:31 PM
views 225  views

रत्नागिरी : पहिल्याच टर्ममध्ये  आमदार म्हणून काम करताना दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी गावागावात अनेक विकास कामे आणली असून तरुणांना रोजगार देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना मंजुरी आणण्यात यश मिळवले आहे.त्यांच्या आमदारकीची ही पहिली वेळ असूनही त्यांनी आणलेली कामे पाहता त्यांचे काम कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दापोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी व नाराजांची समजूत काढण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीचा दापोली दौरा केला यावेळी आमदार योगेश कदम यांच्याबाबत विचारलेला प्रश्नावर बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की,मी पालकमंत्री असताना दापोली मंडणगड व खेड तालुक्यातील अनेक गावांमधून फिरलो आहे. तालुक्याच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव मला आहे. अनेक समस्या या तालुक्याच्या प्रलंबित आहेत मात्र योगेश कदम हे आमदार झाल्यापासून त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत.विकासाची अनेक कामे त्यांनी या परिसरामध्ये मंजूर करून आणली आहेत. अनेक वर्ष प्रलंबित असलेला हर्णे बंदराचा प्रश्न त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने आम्हाला सोडवण्यात यश आले. आज त्याचे भूमिपूजन होऊन कामाच्या निविदाही निघाल्या आहेत.बाणकोट बागमंडला खाडीवरील पूल,केळशी पूल या निविदाही निघाल्या असून,लवकरच कामांना गती येणार आहे. दापोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा,शंभर खाटांचे हॉस्पिटल,महिला बचतगटासाठी प्रशिक्षण व माल विक्री केंद्र,मंडणगड येथे उभारली जाणारी एक हजार एकर वरील एमआयडीसी,हर्णे येथे उभारली जाणारी मिनी एमआयडीसी असे असंख्य प्रश्न आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे सुटले आहेत.दापोली खेड किंवा दापोली महाड या रस्त्यांचे होऊ घातलेले  रुंदीकरण देखील आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे. सभागृहात त्यांनी अनेक विषयात चर्चेत भाग घेताना अभ्यासपूर्ण विवेचन केले असून अभ्यासूवृत्ती तसेच संवाद कौशल्य आणि जनमाणसात आपलेपणाने त्यांची मिसळण्याची भूमिका असल्याने ते पहिल्या टर्ममध्ये यशस्वी झाल्याचे आपले मत आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघात त्यांनी गावागावात जनतेमध्ये मिसळून आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यामुळे ते प्रचंड मताधिक्याने विरोधी उमेदवारावर मात करून विजय होतील. महायुतीतील एक घटक म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी असून राष्ट्रवादी पक्ष व सर्व कार्यकर्ते त्यांच्या  विजयासाठी प्रयत्न करतील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.