
वैभववाडी : तालुक्यातील नेर्ले-तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश अनंत इंदुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा मुंबईत रिअल इस्टेट व्यवसाय असून राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभागही आहे. नेर्ले-तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चालविले जात असून तेथे नेर्ले, तिरवडे तर्फ सौंदळ, जांभवडे तसेच राजापूर तालुक्यातील लगतच्या गावातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. १९६३ पासून नेर्ले-तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्था कार्यरत असून तालुक्यातील दर्जेदार शिक्षणसंकुल अशी ओळख छत्रपती शिवाजी विद्यालयाने जपली आहे. संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक नुकतीच झाली. त्यामधे संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश इंदुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी विश्वनाथ इंदुलकर, जगन्नाथ इंदुलकर, संजय घागरे, अमित खानविलकर आदी उपस्थित होते. संस्थेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष-योगेश इंदुलकर, सचिव- प्रदीप खानविलकर, कार्याध्यक्ष- रोहन इंदुलकर, उपाध्यक्ष- अशोक पाटील, श्रीराम इंदुलकर, सहसचिव- रवींद्र तावडे, आनंद घागरे, खजिनदार- सी. बी. जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. योगेश इंदुलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याकडे ७ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई सचिव पदाची जबाबदारी होती. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. रिअल इस्टेट व्यावसायिक असलेले इंदुलकर राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
विलेपार्ले येथील पार्ले युवक संघ या संस्थेचे अध्यक्ष असून त्यामार्फत कबड्डी स्पर्धा, क्रिकेट सामने, रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. तसेच इंदुलकर रुग्णालयात गरजू रुग्णांना औषधोपचारांसाठी मदत करतात. शाळेला संगणक पुरविले असून दरवर्षी विद्यार्थांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करतात. संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे.