
कुडाळ: योगाला संस्कृतीची जोड असल्याने सामाजिक आरोग्य चांगले राहील.शरीर मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी योग ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या दृष्टीने योग पदविका, पदव्युत्तर योग पदवी सारख्या पदव्या घेणारे, स्वतःबरोबर पदव्युत्तर इतरांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावू शकतात.त्या दृष्टीने जनजागृती व्हावी या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून योग विषयक शिक्षणक्रम सुरू केले आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. " असे उद्गार सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी काढले. त्या बॅरिस्टर नाथ पै बी.एड. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत योगशिक्षक शिक्षणक्रमाच्या पदविका प्रदान सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये 'शरीरशास्त्र आणि आहार शास्त्र ही योगविषयक अभ्यासक्रमाची महत्त्वाची दोन अंगी आहेत.त्यातून अभ्यास करून आपले आरोग्य चांगले रहावे या हेतूने या योग पदविका शिक्षणक्रमात प्रवेश घेत सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व पदविकाधारकांचे अभिनंदन केले.
युवा पिढीला संदेश देताना आपण घेतलेल्या शिक्षणातून समाजऋण फेडा. समाजाला लोकशिक्षणाची गरज आहे.त्याची पूर्तता करा. बाहेरच्या गोष्टीला भूलू नका. एखादी गोष्ट दुसरा करतोय म्हणून करू नका तर ती आपल्या आवाक्यात आहे किंवा नाही, त्यासाठीची आपली क्षमता तपासा आणि नंतर त्यात आवड निर्माण करा.आणि ते आवडीने करा. यश मिळत जाईल. मग मानसिक वैफल्य येणार नाही. एखाद्या क्षेत्रात करिअर करायला जमले नाही म्हणून निराश न होता इतर क्षेत्रात स्वतःला सिद्ध करा.यशस्वी व्हाल. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा असा सल्लाही दिला.
आपल्या यशाचे गमक सांगताना 'ध्येय निश्चित केल्यानंतर कठोर श्रमास पर्याय नसतो. त्यासाठी आपली क्षमता पाहून ध्येय निश्चिती करा. काय करायचे आणि का करायचे? ते ठरवा. जेणेकरून परिश्रमाला गती मिळेल. जे क्षेत्र निवडाल त्यात उत्तम उत्तम होण्याचा प्रयत्न करा.असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग, पर्यावरण, हवा आणि माणसं उत्तम आहेत. त्याचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करा." असे सांगत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे,संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, बीएड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, केंद्र समन्वयक प्रा. नितीन बांबर्डेकर बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएसईच्या प्राचार्य चैताली बांदेकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल इत्यादी उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाच्या विद्यापीठ गीताने व स्वागत गीताने दिप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांचा शिव राजमुद्रा,शाल व श्रीफळ भेट देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थित कार्यक्रमांमध्ये कुडाळचे तहसिलदार वीरसिंग वसावे यांनी आपल्या मनोगतांमध्ये "आपण आयुष्यभर शिकत असतो. शिकत राहिले पाहिजे. शरीर व मन स्वास्थ्यासाठी योगशिक्षण महत्त्वाचे आहे. त्याचा स्वतःच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होई; पण त्याबरोबर समाज आरोग्यासाठी उपयोग होईल. पथ्य पाणी पाळल्यास, ज्ञानाची संजीवनी घेतल्यास उज्वल भविष्यकाळाचे आपण धनी होऊ शकतो. हे लक्षात ठेवून काम करा.'असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्सेस, शिक्षणक्रम सुरू करून उत्तमपणे चालवत असल्याबद्दल संस्था चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगता मध्ये "अपयशातून खचून न जाता ध्येयापासून विचलित न होता कठोर श्रम केले तर यशस्वी होता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीम.धोरमिसे मॅडम आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून आपण हा बोध घेऊया".असे सांगत या पदविका प्रधान सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या योगशिक्षक पदविका प्रधान सोहळ्यांमध्ये एकूण 40 पदविकाधारकांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला साजेल असा गणवेश (ब्लेझर ड्रेस) घालून प्रमाणपत्र,पदक देऊन गौरविण्यात आले. असा सोहळा फार क्वचितपणे पाहायला मिळतो.यावेळी कार्यक्रमाला इतर विभागातील विद्यार्थी -शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा.सुमन करंगळे -सावंत यांनी मांनले.