
सावंतवाडी : कोलगाव चव्हाणवाडी येथील संतोष वासुदेव चव्हाण (वय-४२) या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी कोलगाव आणि सावंतवाडी नगरपालिका हद्दीवर असेलल्या ओहोळाशेजारी सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन दिला. दरम्यान, मयत संतोषचे काका बाबुराव चव्हाण यांनी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं आव्हान निर्माण झालं आहे.
यासंदर्भात प्राथमिक तपास करणारे पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रसाद कदम यांना विचारले असता, कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळेच मृतदेहाचं शवविच्छेदन केले असून काही अंतर्गत अवयव व्हीसेरा रिपोर्टसाठी रत्नागिरी इथ पाठविण्यात येणार आहेत. महिन्याभरात व्हीसेरा रिपोर्ट आल्यानंतर घातपाताबाबतचा उलगडा होईल. घातपाताबाबत काही सुगावा असल्यास पोलिसांना त्यांनी त्याची माहिती द्यावी. जेणेकरून तपासाला गती मिळेल असे सांगितले. दरम्यान, मयत संतोषचे काका बाबुराव चव्हाण यासंदर्भात बुधवारी पोलिसांना भेटणार आहेत.