यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 'अभियंता दिन' उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 18:49 PM
views 103  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भारतरत्न डॉ.एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी परितोष कंकाळ उपस्थित होते.

   

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, वाय.बी.आय.टी प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले उपस्थित होते. कॉलेजच्या सिव्हिल विभागातील सेसा कमिटी प्रतिनिधी बाळकृष्ण परब याने सुरुवातीला डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती दिली व देशाच्या आजवरच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले.

     

प्रमुख पाहुणे परितोष कंकाळ हे स्वतः पेशाने अभियंता असून स्पर्धा परीक्षेद्वारे शासकीय अधिकारी बनले आहेत. कॉलेजच्या वतीने शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भारत सर्व क्षेत्रात वेगाने घोडदौड करत असून येणाऱ्या काळात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार असल्याचे प्रतिपादन कंकाळ यांनी यावेळी केले.

     

अच्युत सावंतभोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक अभियंत्यामध्ये अडचणींवर मात करण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे असे सांगितले. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील समस्या व त्यावरील उपाययोजना शोधून काढल्यास तुमच्या ज्ञानाचा फायदा समाजाला पर्यायाने देशाला मोठया प्रमाणावर होईल असे ते म्हणाले.

     

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ई-लर्निंग मोड्युलचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय सोप्या भाषेत फक्त एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उपप्राचार्य गजानन भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    

यावेळी कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष सिव्हिल विभागातील आदित्य जडये याने तर आभार प्रदर्शन नारायण गाळेलकर याने केले. विभागप्रमुख प्रा.प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल विभागाने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.