
सावंतवाडी : विहाना एज्युकेशनल ट्रस्ट संचालित 'ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमी' सावंतवाडी येथे नुकतीच व्यक्तिमत्व विकास, मोबाईलचे दुष्परिणाम आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांनी भविष्यात ही अकॅडमी जिल्ह्यातील मुख्य स्पर्धा परीक्षा केंद्र बनावी, अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. हर्षद सागावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पहिल्या सत्रात डॉ. सागावकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना व्यक्तिमत्व विकासावर मौलिक मार्गदर्शन केले.आजच्या धकाधकीच्या जीवनात विपश्यना आणि ध्यानधारणा यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे सांगत त्यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत पालकांना सतर्क केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वापसी मुळीक यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासाचे नियोजन आणि येणाऱ्या संकटांना कशा पद्धतीने सामोरे जावे, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
याप्रसंगी व्यासपीठावर विहाना एज्युकेशनल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. अन्विता जाधव, ज्ञानसेवा स्कॉलर अकॅडमीचे अभय जाधव, डॉ. नारायण नाईक, पोलीस ऋतुजा परब, दोडामार्ग पंचायत समितीचे गावकर, श्रुती सावंत, सोनल शेलटकर, रमेश मेस्त्री, वासंती तेडोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी परब आणि भक्ती गावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नारायण नाईक यांनी मानले.











