सिंधु सरस प्रदर्शन २१ ते २५ मार्चला कुडाळमध्ये : ZP अध्यक्ष प्रमोद कामत

बचत गटांसाठी मोठी पर्वणी ; ७५ स्टॉल उपलब्ध
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 17, 2026 18:27 PM
views 54  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हास्तरीय सिंधुसरस प्रदर्शन कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर दिनांक २१ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी व त्यांच्या उत्पादनासाठी ही एक मोठी पर्वणी असते. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होत आहे. या प्रदर्शनात ७५ स्टॉल असून जिल्ह्यातील बचत गटांनी व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. 

सिंधु सरस २०२६ या जिल्हास्तरीय प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी जि. प. अध्यक्षांच्या दालनात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जीपचे उपाध्यक्ष दादा साईल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे अधिकारी उपस्थित होते. 

 ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत कुडाळ येथे होणार आहे.

महोत्सवात जिल्हाभरातील महिला बचत गटांकडून विविध खाद्यपदार्थ, काजू, आंबा, मसाले, हातमाग उत्पादने तसेच इतर ग्रामीण उत्पादने यांचे ७० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनदिनी (२१ मार्च) बचत गटांच्या महिलांची उपस्थिती अपेक्षित असून, विविध स्पर्धा व सायंकाळी समूह नृत्य सादर होणार आहे. २२ मार्च रोजी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीविषयक शिबिरे आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ मार्चला बँकिंग व ग्रामपंचायत विषयक कार्यशाळा, महिला गट नृत्य स्पर्धा आणि रात्री पारंपरिक दशावतार नाट्य सादर होणार आहे.

२४ मार्च रोजी महिला व बाल विकास आणि आरोग्य विषयक कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक सादरीकरणे होतील. तर २५ मार्च रोजी बक्षीस वितरण समारंभ, आढावा बैठक आणि महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक बळकटी मिळण्यासोबतच त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जि प अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी केले.