युध्दात जिंकले व तहात हरले, या सरकारचे उद्योग जनतेला समजले !

शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य़ संदिप सरवणकर यांचा टोला
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 29, 2022 16:59 PM
views 167  views

वैभववाडी : राज्यातील एकापाठोपाठ एक उद्योग राज्याबाहेर जात आहेत. वेदांता फाँक्सकाँन पाठोपाठ टाटाचा C-295 ह्या सैनिकी एअरबसचा प्रकल्प हा देखील गुजरातला गेला. इडी सरकारच्या ३ महीन्याच्या कालावधीत राज्यातील महत्त्वाच्या चार प्रकल्पापैकी तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत.या सरकारकाकडून बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत. आता येथील तरुणांना हे सरकार काय उत्तर देणार आहे, अशा शब्दांत शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य़ संदिप सरवणकर यांनी टोला लगावला आहे. 

      राज्याबाहेर जात असलेल्या उद्योगावरून श्री सरवणकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, हिदुत्वाचे कारण सांगून ठाकरे सरकारमधून एक गट वेगळा झाला. भाजपासोबत सरकार स्थापन केले. परंतु या सरकारने ३ महिने होण्याच्या आतच  ४ पैकी ३ प्रकल्प महाराष्ट्रातुन गुजरातकडे नेले. हा केवळ दुर्देवी योगायोगा नसुन  हे नविन स्थापित सरकारमुळे महाराष्ट्राच्या नशिबी आलेले शापीत भोग आहेत, हे आता जनतेला समजू लागले आहे. सुरवातीला  केवळ हिंदुत्वासाठी धोका निर्माण झाला होता, म्हणुन उध्दव ठाकरेंना आपण धक्का दिला व भाजपासोबत तह केला, असे मुख्यमंत्री  वारंवार सांगत असतात. परंतु त्या तहात आपल्या लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसऴली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नावर होणारी वृध्दीही आपण गमावली आहे. हे आता स्पष्ट दिसत आहे. आपल्या तरुणाना दहीहंडी, दांडीया यासाठी प्रोत्साहन देवुन हे सरकार मात्र त्यांचे रोजगार व सरासरी दरडोई उत्पन्नाबाबत घसरणीला लागले  आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकल्पांचा तह तर केला नव्हता ना? असा सवाल सरवणकर यांनी उपस्थित केला.

युध्दात सर्व माफ़ समजुन कसेही युध्द जिंकले तरी तहात बरच काही त्यांनी गमावले ह्यावर आता  शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टीका सरवणकर यांनी केली आहे.