
सावंतवाडी : जगातील महिलांना आपल्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करून हे स्वातंत्र्य मिळवावे लागले. मात्र, भारतीय महिलांना आपल्या संविधानानेच हे हक्क दिल्याने सर्व क्षेत्रे महिलांना खुली झाली आहेत. म्हणूनच भारतातील स्त्रिया रिक्षा ड्रायव्हर ते वैमानिक अशा विविध पदावर कार्यरत आहेत. सर्वच चित्रे महिलांनी प्राप्त केल्याने महिलांनी आता केवळ लघु नव्हे तर भविष्याचा वेध घेत आपल्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने वाटचाल करावी असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ विजयालक्ष्मी चिंडक पाटील यांनी येथे केले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात शनिवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला अध्यक्ष प्रा सुषमा विजय हरकुळकर ह्या होत्या.यावेळी विचारपीठावर जिल्हा संघटक तथा जिल्ह्यातील नामांकित कवी जनी कुमार कांबळे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष विजय कदम ,सावंतवाडी अध्यक्ष विजय नेमळेकर ,महिला अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर, रवीना कांबळे, करुणा कदम , कौंडल्य पवार चंद्रशेखर जाधव ,सुनील जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना व स्वागत गीताने कार्यक्रमाची शानदार सुरुवात करण्यात आली.
डॉ. पाटील पुढे म्हणाल्या की, सहज मिळणाऱ्याचे मोल समाजाला समजत नाही असे सांगून जगातील महिलांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, भारतीय महिला त्याला अपवाद असून आपणाला संविधानानेच सर्व स्वातंत्र्य बहाल केल्याने स्वातंत्र्य व समता आपोआपच मिळाली हे त्यांनी स्पष्ट केले .या स्वातंत्र्यामुळेच महिलांनी विविध विकासाचे टप्पे कसे पार केले हे त्यांनी सांगून देशात उदारीकरण धोरण सुरू झाल्यानंतर मग सर्वच क्षेत्रात कशी स्पर्धा सुरू झाली हे सांगून स्त्रियांमधील सुंदरी स्पर्धेचे उदाहरणही त्यांनी यावे दिले. दूरदर्शन मधील मालिका ,जाहिराती या कशा फसव्या असतात हे सांगून महिलांमधील भेदाभेद महिलांनीच संपवायला हवेत असे आवाहन करून महिलांनी अत्तदीप भव व्हावे असा सल्लाही यावेळी दिला. अध्यक्षपदावरून बोलताना प्रा सुषमा हरकुळकर यांनी माणसाची प्रगती म्हणजे राहणीमान नसून धम्म संस्कार आत्मसात केल्यानेच माणसाची खरी धार्मिक प्रगती होते हे सांगून महिलांनी याबाबत पुढाकार घ्यावा व धार्मिक संस्कार करावेत असे आवाहन केले. महिलांचे संघटन हे प्रगतीची सुरुवात असल्याचे सांगून महिला जेव्हा संघटित होतात तेव्हा चळवळ सुद्धा सक्रिय होते म्हणून महिलांनी धर्म चळवळीत सक्रिय व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता जाधव यांनी केले तर आभार प्रतिभा जाधव यांनी मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कदम ,अश्विनी जाधव यांनी केले पाहुण्यांची ओळख मोहन जाधव यांनी केली. यावेळी सत्यवती कदम (सांगली,) सुहासिनी तेंडुलकर( बांदा )सविता कदम( सांगेली) मीनाक्षी पवार (सावंतवाडी )जयश्री पाटणकर सावंतवाडी ,सुमित्रा जाधव kinle रूपाली जाधव इनसुली अर्चना शेरलेकर इन्सुली सुचिता जाधव, मळगाव, कल्पना जाधव कुणकेरी अशा तालुक्यातील दहा ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा शाल सन्मानस्चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले .यावेळी बौद्ध विहार सावंतवाडी त व्हावे व बुद्धगया क्षेत्र मुक्त व्हावे असा ठराव मंजूर करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.