
देवगड : शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव मध्ये 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 या दरम्यान महिला विकास समितीतर्फे महिला सक्षमीकरण सप्ताह राबविण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
दि.10 फेब्रु रोजीअभिजीत चव्हाण, क्लस्टर कोर्डिनेटर, ब्लॉक मिशन मॅनेजमेंट देवगड महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यांनी महिला बचत गट यावर मार्गदर्शन केले. दि.11 फेब्रु ला श्रीमती आज्ञा कोयंडे,लेखक दिग्दर्शक यांनी महिला म्हणून सक्षम बनताना येणाऱ्या अडचणी, दि. 12 फेब्रु ला डॉ. शीतल चव्हाण, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव यांनी मासिक पाळी आणि स्वच्छता यावर मार्गदर्शन केले. दि.13 फेब्रु ला श्रीम.अर्पिता मुंबरकर, संचालकः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ गोपुरी आश्रम वागदे, कणकवली यांनी महिला सक्षमीकरण आणि व्यसनमुक्ती व दि.14 फेब्रु रोजी अॅड. समृद्धी साटम यांनी महिलांविषयी कायदे यावर मार्गदर्शन केले. तर दि. 15 फेब्रु रोजी प्राध्या. आशय सावंत यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व महिला व स्वातंत्र्योत्तर महिला यावर मार्गदर्शन केले. महिला विकास समितीतर्फे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते. महिलांना सक्षम करणे स्त्री,पुरुष समानता पसरवणे, सामाजिक समस्या विषयी चर्चा करणे, महिलांचे आरोग्यविषयक समस्या व चर्चा करून त्यावर उपाययोजना करणे अशी विविध उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून महिला विकास समिती सतत कार्यरत असते.पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कायद्यामुळेच महिलांना समानतेचा हक्क,वारसा हक्क, शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे.प्रत्येकाने आपल्या हक्क आणि अधिकारासाठी कायदा समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याला समजत नाही ते विचारून माहिती करून घेणे कमीपणाचे नाही. वेळीच विचारले नाही, तर मागे राहाल, असे मार्गदर्शन अॅड. समृद्धी साटम यांनी शिरगाव येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले.
पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या महिला विकास समितीच्यावतीने या सप्ताहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अॅड. समृद्धी साटम म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांसाठी विद्यार्थ्यांनी सजग राहायला हवे. तरुण वयात इंटरनेटचा वापर योग्य पद्धतीने करा.सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून ओटीपी, वेगवेगळ्या लिंक,नोकरीचे आमिष,सायबर गेमिंग यांसारख्या युक्त्या वापरून आपली फसवणूक करतात, यापासून सावध राहिले पाहिजे.कोणत्याही प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका, सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी सायबर सेल किंवा वेवसाइटवरूनही नोंदवता येतात.पोलिसांना खरी माहिती या.कोणतीही माहिती लपवू नका.मोबाइलवर घडलेल्या गुन्ह्यांचे पुरावे मोबाइलवरच सेव्ह करून ठेवा.न्यायालयात लिखित पुराव्यांना खूप महत्त्व असते, अशी माहिती दिली.यावेळी वारसा हक्क, बालविवाह कायदा, प्रसूती रजा, मॅरेज अमेंडमेंट बिल, कौटुंबिक हिंसाचार,सायबर क्राइम, लैंगिक शोषण, समानतेचा कायदा, याचाबत अॅड. समृद्धी साटम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण सप्ताहात ग्रामीण उपजीविका अभियानाचे क्लस्टर कोऑर्डिनेटर अभिजीत चव्हाण, लेखक दिग्दर्शिका आज्ञा कोयंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल चव्हाण, स्त्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, विधीतज्ज्ञ अॅड. समृद्धी साटम, प्राध्यापक आशय सावंत आदी तज्ज्ञ वक्त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष संभाजी साटम, शिरगाव हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार कदम, प्राचार्य समीर तारी, प्रा. सोनाली ताम्हणकर, प्रा. कोमल पाटील, प्रा. सुगंधा पवार, प्रा. सिद्धी कदम, महिला विकास समितीप्रमुख प्रा. मयूरी कुंभार आदी उपस्थित होते. अक्षता मोंडकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. आशय सावंत यांनी आभार मानले.