
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकर वाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी एका जोडप्यासह पाच जणांना अटक केली आहे. गृहदोष आणि मुलं होत नसल्याने ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस कसून तपासणी करत आहेत.
अघोरी पूजेचा प्रकार काय ?
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक इसमाच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली सुरू असून घरात कोणती तरी जादूटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक आंबेडकरवाडी येथे विशाल विजय जाधव यांच्या राहत्या घरात जाऊन खातरजमा केली असता. घरात सुमारे ४ बाय ४ बाय ८ लांबी रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला. तसेच अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सुद्धा आढळून आले. यामध्ये लिंबू पानसुपारीचे विडे , हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तीळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरू, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोट्या काठया, कांबळी, घोंगड्याचे तुकडे, बिब्बे, कवडे, अशा साहित्याची मांडणी करून नरबळी अगर अन्य कोणत्यातरी अघोरी कृतीकरता कोयता आणि सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली. आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना ही हकीकत कळवली. तेव्हा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, अनिल पाटील, महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून खात्री केली.
5 जणांना घेतलं ताब्यात
त्यावेळी घरात असलेल्या आरोपीत क्र. १ विशाल विजय जाधव ( वय ३० वर्षे, रा. घ. नं. ३५३ हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग , सध्या राहणार रूम नं. १ काजोळकर हाऊस राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी ठाणे (पश्चिम) . आरोपी क्र. २ सुस्मित मिलिंद गमरे ( वय ३३ वर्षे रा. मु. पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर , साई निवास सोसायटी, विंग न. ९ रूम नं . ७०९. ता. चिपळूण जि. रत्नागिरी ) , आरोपी क्र. ३ सौ. हर्षाली विशाल जाधव पूर्वाश्रमीची समृद्धी अविनाश हडकर, ( वय 35 वर्षे राहणार घ. नं. ३५३ हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग , सध्या राहणार रूम नं. १ काजोळकर हाऊस राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी ठाणे पश्चिम ) , आरोपीत क्र. ४ अविनाश मुकुंद संते ( वय ३२ वर्षे रा. उसरघरगाव मानपाडा दिवा रोड डोंबिवली ( पूर्व) जि. ठाणे. ) , व आरोपी क्र. ५ दिनेश बालाराम पाटील ( वय ३४ वर्ष रा. उसरघरगाव मानपाडा दिवा रोड डोंबिवली ( पूर्व) जि. ठाणे. ) हे आढळून आले.
अघोरी पूजेमागचं धक्कादायक सत्य
पोलिसांनी त्यांच्याकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण विचारताच विशाल विजय जाधव यांचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याचे पत्नीस मूलबाळ होत नसल्याने त्यांची पीडा दूर करण्यासाठी ही अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतु ते समाधानकारक माहिती देत नाहीत, गुन्ह्याचे सखोल अन्वेषणाकरिता नमूद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरता वापरलेली इको कार क्र. MH05- EV6561 ही जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
दरम्यान काही वर्षांपूर्वी अघोरी कृत्यासाठी झालेले नांदोस हत्याकांड ताजे असतानाही जिल्ह्यात अशा प्रकारे पर जिल्ह्यातून आलेल्या तंत्र मंत्र जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा सहज वावर वाढत आहे. शहरातील सुशिक्षित माणसे देखील अशा अंधश्रद्धांना बळी पडत आहेत यासाठी सायबर गुन्ह्याबाबत जशी पोलिसांकडून जनजागृती होते त्याच प्रकारची जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी होणे गरजेचे आहे.