
देवगड : कोकण किनारपट्टीवरील सर्वात सुरक्षित असलेल्या विजयदुर्ग बंदरात सागरी रो रो सेवेचे जेटी उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून काम सुरू असून सध्या विजयदुर्ग बंदरात प्लॉटिंग पार्टून्स उभारले जात आहेत. हे काम अजून १० ते १५ दिवस काम सुरू असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आधी दोन-तीन दिवस ही सेवा सुरू होईल. या सेवेचा टेस्ट ड्राईव्ह यशस्वीरित्या झाल्यावरच त्याचे बुकिंग १० ते १२ दिवस ऑनलाईन पद्धतीने सुरू होईल, अशी माहिती बंदर निरीक्षक अधिकारी उमेश महाडीक यांनी दिली आहे.
राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कोकणात पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला असून सागरी रो रो सेवा ही त्याचाच एक भाग आहे. विजयदुर्ग बंदर हे सुरक्षित असून त्याच अनुषंगाने याची रो रो सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. मागील आठवड्यात प्लॉटिंग पार्टून्स उभारणीचा शुभारंभ बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. येत्या १० ते १२ दिवसात या प्लॉटिंग पार्टून्सची उभारणी पूर्ण केली जाईल. तसेच १५ ऑगस्ट २०२५ म्हणजे स्वातंत्र दिनी मुंबई ते विजयदुर्ग अशी सागरी रो रो सेवेची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर गणपती सणापूर्वी मुंबई माझगाव ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होईल.
मुंबई ते विजयदुर्ग प्रवास तीन तासात
सागरी रो रो सेवा ही कोकणसाठी विशेष असून अवघ्या ४ ते ४.३० तासात प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतील. तर मुंबई ते रत्नागिरी अंतर ३.३० तासात पूर्ण होईल.