कोट्यावधीची टेंडर काढून भंगसाळ - तिलारीच्या पाण्याचा संगम घडवणार..?

प्रवीण गांवकर यांचा केसरकरांना सवाल
Edited by:
Published on: August 19, 2024 13:31 PM
views 286  views

दोडामार्ग : तिलारीचे पाणी तालुक्यातील गावापर्यंत पोहचवता येत नाहीय. पण दीपक केसरकर तिलारीचे पाणी चिपीला नेण्यासाठीचा प्रकल्प आखतात.  कोट्यावधीची टेंडर काढून भंगसाळ आणि तिलारीच्या पाण्याचा संगम घडवण्याचे केसरकरांचे नियोजन आहें का? असा संतप्त सवाल आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे सचिव प्रवीण गांवकर यांनी पत्रकाद्वारे केला आहें.

तिलारी धरणाच्या आसपासछाया गावांसह आडाळी, मोरगाव, कळणे, डेंगवे, पडवे माजगाव परिसरातील सिंचनासाठी शाश्वतं सुविधा नाहीत. तालुक्यातील जनतेने तिलारीच्या धरणासाठी मोठा त्याग केला, मात्र तालुक्यातील सर्व गावांना पाणी पोहचविता आलेले नाहीं. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतजमीन ही एकपिकी आहें. काही भाग पडीक आहें. सिंचन सुविधा निर्माण झाल्यास बागायती क्षेत्र वाढून रोजगार वाढू शकतो. मात्र त्या दृष्टीने कोणत्याही योजना आमदार दीपक केसरकर यांच्याकडे नाहीत. तिलारी धरणापासून जवळची केर पंचक्रोशी, पिकुळे पंचक्रोशी तसेच आडाळी पंचक्रोशी तील शेकडो हेक्टर क्षेत्र हे आज सिंचनाअभावी पडीक आहें.

नगदी उत्पन्न देणारी अनेक पीक यां भागात घेतली जाऊ शकतात. मात्र येथे धरणाचे पाणी गुरुत्वकर्षण पद्धतीने पोहचणार नाहीं. त्यासाठी उपसा सिंचन योजना करावी लागेल. मात्र त्याबाबत केसरकरांकडे आरखडा नाहीं. तर 200 कोटी खर्चून तिलारीचे पाणी लिफ्ट करुन चिपीत नेण्याची घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र तेथील विमानतळसाठी कुडाळच्या भंगसाळ नदीतून एमआयडीसी ने पाणी नेले आहें. त्याचाही पुर्ण क्षमतेने उपयोग होत नाही. मग कोट्यावधीचा खर्च करुन चिपीत भंगसाळ व तिलारीच्या पाण्याचा संगम घडवून आणायचा आहें का? त्यापेक्षा तुमचे आराखडे तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी करा. त्यातून कदाचित तुमच्या मतांचे तरी थोडेफार सिंचन होईल.