
'त्या' भेटीमागे खूप काही लपलंय ?
कणकवली : कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे संदेश पारकर यांनी मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे अभिनंदन केले. कणकवली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी संदेश पारकर यांना दिले. या भेटी प्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, कणकवली शहर विकास आघाडीचे संकल्पक तथा माजी आमदार राजन तेली, श्री. तेली यांचे चिरंजीव प्रथमेश तेली हे देखील उपस्थित होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संदेश पारकर हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
कणकवलीत नगरपंचायत निवडणुकीत 'भाजप' विरुद्ध सर्वपक्षीयांची 'कणकवली शहर विकास आघाडी' असा सामना रंगला होता. या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली यांनी पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे राजन तेली यांच्याच संकल्पनेतून कणकवली शहर विकास आघाडी स्थापन झाली होती. मुख्य म्हणजे याच कणकवली शहर विकास आघाडीला कणकवलीकारांनी कौल दिला व कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना चांगल्या मताधिक्याने विजयी देखील केले.
संदेश पारकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. कणकवली नगरपंचायत निवडणूक दरम्यान 'उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पद आपण सद्यस्थितीत बाजूला ठेवले आहे', असे संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले होते. दोनच दिवसांपूर्वी कणकवली नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आणि संदेश पारकर हे नगराध्यक्ष देखील झाले. साहजिकच संदेश पारकर यांनी बाजूला ठेवलेले उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुखपद आता जवळ केले आहे की नाही, असा प्रश्न , 'कोकणसाद'च्या वतीने पारकर यांना त्यांनी सोमवारी दुपारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी विचारात आला होता. मात्र, संदेश पारकर यांनी या प्रश्नाला बगल दिली होती. पण, आज मंगळवारी संदेश पारकर यांनी शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे संदेश पारकर येत्या काळात शिंदे शिवसेनेमध्ये दिसणार का, याची चर्चा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान याविषयी विचारणा केली असता कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वच पक्ष एकत्र होतो. अर्थात त्यामध्ये शिंदे शिवसेनेचाही समावेश होता. शिंदे शिवसेनेने आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला खूप मदत केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी 'कोकणसाद'शी बोलताना दिली.










