सत्ताधाऱ्यांकडील अमाप पैसा येतो कुठून ?

आ. भास्कर जाधव यांचा कुडाळमध्ये परखड सवाल
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 23, 2025 22:06 PM
views 35  views

कुडाळ : "आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा?" असा थेट आणि रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या 'भस्मासुरी' प्रवृत्तीवर कडाडून टीका करत कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

लोकशाहीसाठी पैशाचा वापर घातक

आ. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, "किती मतांनी निवडून आलो यापेक्षा आपण कोणत्या प्रवृत्तीच्या विरोधात उभे आहोत, हे महत्त्वाचे आहे. कोकणची भूमी लढवय्यांची आणि विचारवंतांची आहे. मात्र, आज पैसे वाटून उमेदवार निवडून येऊ लागले, तर समाजाची अधोगती होईल. 'लाडकी बहीण' सारख्या योजनांच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून पैसे वाटणे हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे."

'शिवसेना संपलेली नाही, निखारे अजूनही जिवंत' : अरविंद सावंत

खासदार अरविंद सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "पैशाने विकली जाणारी लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? मुंबई आणि सिंधुदुर्गचे नाते अतूट आहे. कोकणाने नेहमीच विचारधारेला साथ दिली आहे, मात्र आज काही लोक विचारशून्यतेकडे वाटचाल करत आहेत. शिवसेना संपलेली नाही; आजही इथले निखारे जिवंत आहेत."

गौरीशंकर खोत (उपनेते): संदेश पारकर यांच्या विजयाने जिल्ह्यात नवी ऊर्जा आली आहे. एकजुटीने लढलो तर यश निश्चित आहे.

अरुण दुधवडकर (संपर्कप्रमुख): ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. शिवसेनेची कामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि आतापासूनच तयारीला लागा.

  वैभव नाईक (माजी आमदार): आपले कार्यकर्ते सत्तेसाठी नाही, तर विचारांसाठी प्रामाणिक आहेत. पैशाच्या जोरावर निवडणूक लढणाऱ्यांसमोर आपण ताकदीने उभे आहोत.

 जी. जी. उपरकर (माजी आमदार): पैसे न वाटताही विजय मिळवता येतो, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

संदेश पारकर (नगराध्यक्ष): जनतेचा विश्वस्त म्हणून मी जबाबदारी पार पाडेन. बदललेली राजकीय परिस्थिती समजून घेऊन कार्यकर्त्यांनी सन्मानाने काम करावे.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

यावेळी कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या बैठकीस मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले, तर आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.