
दोडामार्ग : जिल्हा परिषदच्या मराठी शाळा आज ओस पडत चाललेल्या काळात दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कोलझर ही शाळा मात्र एक सकारात्मक व प्रेरणादायी अपवाद ठरत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षण हेच आपले खरे प्रगतीपुस्तक मानून येथील शिक्षकांनी शाळेला नवसंजीवनी दिली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार व सहाय्यक शिक्षिका शरयू पाटील यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते न थांबता, चाकोरीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी घेतलेले प्रयत्न आज पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींसाठी कौतुकाचा विषय ठरत आहेत. विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे कोलझर शाळेने शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी आता स्थानिक नागरिकही पुढाकार घेऊ लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई यांनी ‘माझी शाळा’ या भावनेतून शाळेसाठी स्वखर्चाने वाय-फाय (WiFi) इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल शिक्षणाच्या युगात इंटरनेटची अत्यंत गरज लक्षात घेऊन देसाई यांनी घेतलेला हा निर्णय शाळेच्या अध्यापन प्रक्रियेला निश्चितच नवी गती देणारा ठरणार आहे.
विद्यार्थी गुणवत्ता विकास, ऑनलाईन शैक्षणिक साहित्याचा वापर तसेच शालेय प्रशासकीय कामकाजासाठी इंटरनेट सुविधा अत्यावश्यक होती. शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठीची तळमळ, शाळेची शैक्षणिक प्रगती व क्रीडा स्पर्धेतील यश यामुळे प्रेरित होऊन दीपक देसाई यांनी हा उपक्रम राबविला.
या दातृत्वपूर्ण सहकार्याबद्दल कोलझर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन दीपक देसाई यांचे आभार मानण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र दळवी, उपाध्यक्ष उल्हास देसाई, सर्व सदस्य, मुख्याध्यापक अरुण पवार व सहाय्यक शिक्षिका शरयू पाटील उपस्थित होते. कोलझर केंद्र शाळेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील मराठी शिक्षणासाठी आशेचा किरण ठरत असून, शिक्षक, समाज आणि पालक यांच्या संयुक्त सहभागातून शाळा कशी प्रगत होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.










